दुष्काळामुळे फळबाग जगवण्यास शेतकऱ्यांना रोख स्वररूपात हेक्टरी २३ हजार रुपये अनुदान देण्याचा विचार सरकार स्तरावर सुरू असून, लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊन हा निर्णय घेतला जाईल व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील दुष्काळी भागाचा विखे यांनी दौरा केला. आमदार सुरेश धस, साहेबराव दरेकर, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार संजय पवार आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, की दुष्काळी व टंचाई स्थितीत कृषी विभागाच्या वतीने करावयाच्या कामांना मंजुरी दिली असून, टंचाईग्रस्त भागात कृषी विभागाने मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेऊन जास्तीत जास्त मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, तसेच टंचाई निवारण कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी कामे हाती घ्यावीत. शेततळे, नालाबांध, सामूहिक शेततळी यांसारख्या कामांना प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांच्या फळबागांचे पाण्याअभावी मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून फळबागा जगविणे अत्यंत गरजेचे आहे. फळबागांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या माध्यमातून रोख स्वरूपात हेक्टरी अनुदान उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करण्यात येत असून, हा निधी शेतकऱ्यांना नजीकच्या काळात मिळणार आहे. शेतकऱ्यांचे पशुधन जगविणे आवश्यक असून, पशुधन जगविण्यासाठी चार छावण्या सुरू केल्या आहेत. छावण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा, पाणी उपलब्ध करून दिले आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी वाढे उपलब्ध असून येत्या काळात चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. इतर जिल्हय़ांतून चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच पाणी उपलब्ध असलेल्या शेतीमध्ये वैरण उत्पादन घेण्यात येईल. तालुक्यात टंचाईग्रस्त भागातील दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी मांडलेल्या समस्या व सूचनांवर विचार करण्यासाठी राज्य पातळीवर लवकरच बैठक घेणार असून बैठकीस टंचाई भागातील लोकप्रतिनिधी, प्रगतिशील शेतकऱ्यांना बोलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.