परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये याची काळजी पाल्यांइतकीच पालकांनीही घेणे आवश्यक आहे. या काळात आपले विचार नकारात्मक होणार नाहीत याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. नकारात्मक विचारांचा परिणाम अभ्यासावर होतो व नंतर समुपदेशनाच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांची मानसिकता बदलावी लागल्याची उदाहरणे आहेत. या काळात केवळ चांगल्या गोष्टींचाच विचार विद्यार्थ्यांनी करावा. माझा परीक्षेचा निकाल चांगलाच लागणार आहे व मला चांगले यश मिळणार आहे, असा विचार रोज दहा मिनिटे करावा. आपल्या डोळ्यांसमोर यशाची प्रतिमा निर्माण करावी. परीक्षेच्या काळात झोप चांगली व्हावी व अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करणे टाळावे. रक्तात शर्करेचे प्रमाण चांगले राहिल्यास त्याचा मेंदूवरही चांगला परिणाम होतो. त्यामुळे योग्य आहारावर लक्ष द्यावे. अगदी वेळेपर्यंत मित्र-मैत्रिणींशी चर्चा करणे किंवा परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांनी चर्चा करूच नये कारण याचा नकारात्मक परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. एकूण विद्यार्थ्यांपैकी पाच ते सात टक्के विद्यार्थ्यांमध्ये टोकाचा तणाव निर्माण होत असतो. साधारणत: अशीच प्रकरणे आमच्याकडे येतात. अशावेळी समुपदेशनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमधील तणाव कमी करावा लागतो.
पालकांनी पाल्यांच्या केवळ गुणांवरच लक्ष केंद्रित करणे टाळावे. पालकांचे पाल्यांशी वागणे हे निकालकेंद्री न राहता मेहनतकेंद्री असावे. अवास्तव अपेक्षा ठेवून नकारात्मक परिणाम किंवा तणाव निर्माण होण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन पालकांनीही बाळगावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुधीर भावे यांनी दिला.
‘अतिरिक्त परिश्रम नको, जागरण टाळा’  
परीक्षेच्या काळात नवीन अभ्यास करण्याचे टाळावे. आजवर जितका अभ्यास झाला असेल त्यावरच लक्ष केंद्रित करावे. घरात किंवा घराबाहेर वाद किंवा भांडणे टाळावीत. वर्षभर ज्या अभ्यासाच्या वेळा होत्या त्याच कायम राखाव्या. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी अतिरिक्त जागरण टाळावे.
ज्या विषयाची परीक्षा असेल त्या विषयांच्या मुद्द्यांची मनातल्या मनात उजळणी करावी. पालकांनीही या काळात टीव्हीचा वापर टाळावा. टीव्हा हा विरंगुळा नाही तर वेळ खाणारा प्रकार आहे, हे लक्षात ठेवावे. टीव्ही बघण्यानेही मुलांवर तणाव निर्माण होऊ शकतो.
त्याऐवजी मुलांना वाचन करावयास किंवा अभ्यासक्रमातील आकृत्यांचा सराव करण्यास प्रोत्साहित करावे. अभ्यासाची तयारी कुठवर आली आहे याची पालकांनी चर्चा करावी. अमुकच गुण मिळावेत असा आग्रह न धरता पाल्याला गुणांची सर्वसाधारण कक्षा ठरवून द्यावी. याने पाल्यावर दडपण न येता आत्मविश्वास निर्माण होईल, असा सल्ला बिंझाणी महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक अमर दामले यांनी दिला.