बौद्ध हा धर्म नसून एक जीवनशैली आहे. बाबासाहेबांच्या धर्मातरानंतर साहित्य लेखनात बदल होत गेले व साहित्यातून ते प्रकर्षांने जाणवले. जगात शांतीच्या व माणुसकीच्या सावल्या वाढवायच्या असतील, तर बौद्ध साहित्य वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले.
बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने लातुरात आयोजित केलेल्या तिसऱ्या बौद्ध साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून कांबळे बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक फ. म. शहाजिंदे यांच्या हस्ते झाले. अॅड. त्र्यंबकदास झंवर, डॉ. चंद्रकांत पुरी, अॅड. बळवंत जाधव, प्रदीप राठी, परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, संयोजक प्रा. व्यंकट कीर्तने यांची उपस्थिती होती. उत्तम कांबळे संपादित ‘जगण्याच्या जळत्या वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. एम. डी. िशदे, प्रा. डॉ. संजय नवले, दत्ता बनसोडे, कैलास िशदे, चेतन िशदे आदींना या वेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
वास्तव आणि भास यांचा संभ्रम करून तयार झालेले हे जग आहे. त्यामुळे येथे सुरू असलेले युद्ध दिसत नाही, तरीही मरणाच्या राशी दिसत आहेत आणि त्याला मारणारे शत्रू मात्र दिसत नाहीत. १९५६ मध्ये बाबासाहेबांनी धर्म बदलला नि लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला. हे बदल त्या काळच्या महिलांनी गायलेल्या जात्यावरील ओवींमधून, शेतामधील गीतांमधून प्रकर्षांने जाणवत होते. परिवर्तनाच्या भाषा समोर येत असताना स्त्रियांचे व पुरुषांचे आतून, बाहेरून जगणे बदलत होते, असे कांबळे म्हणाले.
गौतम बुद्ध बोधीच्या झाडाखाली बसले होते. हे झाड अधिक प्राणवायू देते. अन्न व पाण्यासाठी त्याच्या मुळा लांबवर जातात. ते झाड विषाणू, प्रदूषित गोष्टी शोषण करते. हे झाड जमिनीचा गर्भ प्रदूषणमुक्त करते, म्हणून गौतम बुद्ध या झाडाखाली बसले होते, हा दाखला देत वर्षांतून एकदा तरी बोधीवृक्ष लावावा म्हणजेच असे साहित्य संमेलन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहाजिंदे यांनी भारत कृषिप्रधान देश आहे, तसाच तो जातिप्रधान देश आहे, असे म्हटले. आता पूर्वीची दलित साहित्यसंमेलने भरताना दिसत नाहीत. उलट त्यांचे विघटन होऊन फुले, आंबेडकरी, विद्रोही, मराठा, जैन, मुस्लीम अशी विविध संमेलने भरू लागली आहेत. ही संमेलनेही मोठय़ा प्रमाणात भरत असली, तरी त्यात माणसाबद्दलची करुणा मात्र दिसून येत नाही. दिवसेंदिवस जाती विखुरल्या जात असून हे थांबवायचे असेल, तर जाती-जातीचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. अॅड. त्र्यंबकदास झंवर, अॅड. बळवंत जाधव, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. कीर्तने यांचीही भाषणे झाली.