News Flash

आर्वीकरांवर गाळ कोरून तहान भागविण्याची वेळ

आता कुठं जानेवारी संपण्याच्या बेतात आहे. पावसासाठी अजून चार महिने बाकी आहेत. हे चार महिने ग्रामीण भागातील जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत.

| January 30, 2013 12:46 pm

आता कुठं जानेवारी संपण्याच्या बेतात आहे. पावसासाठी अजून चार महिने बाकी आहेत. हे चार महिने ग्रामीण भागातील जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत. कारण आताच शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी आसुसला असून एकेका धरणातील जलसाठा संपुष्टात येऊ लागल्याने प्रशासनासमोरही या जल संकटाला कसे तोंड द्यावे, ही समस्या उभी राहिली आहे. धुळे-मालेगाव महामार्गावरील आर्वी या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पुरमेपाडा धरणातून अक्षरश: गाळ कोरून कोरून पाणी मिळवावे लागत आहे.
५६० दशलक्ष घनफुट क्षमता असलेले पुरमेपाडा धरण कोरडे झाले असून या धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आर्वीकरांचा घसा कोरडा पडण्याची वेळ त्यामुळे आली आहे.
हरएक प्रयत्न करून पाणी मिळवून एकेक दिवस ढकलणे, हेच  आर्वीकरांचे काम उरले आहे. धरणातील गाळामध्ये चरे ओढून जो मृत साठा उपलब्ध होतो, त्यावर सध्या आर्वीकरांचे जीवन अवलंबून आहे. मृत साठय़ातील पाणी पाईपव्दारे टाकीत टाकले जाते. टाकीतील पाणी नळाव्दारे घरोघरी आल्यावर सुरू होते पाणी स्वच्छ करण्याची मोहीम. हे पाणी अत्यंत गढूळ असल्याने घरोघरी त्यात तुरटी टाकली जाते. तुरटीमुळे पाणी स्वच्छ झाल्यावर गाळून जंतुंचा नाश होण्यासाठी पाणी उकळविले जाते. त्यानंतर पुन्हा पाण्यात जंतुनाशक टाकले जाते. अशा प्रकारे दररोज नळाव्दारे पाणी आल्यानंतरचा एक तास या प्रक्रियेत जात आहे.
या टंचाईने जनतेला एकेक थेंब पाण्याचे महत्व लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे परिसरातून जाणाऱ्या जलवाहिनीतील गळतीचा कसा लाभ करून घेता येईल, यासाठीही महिलांनी शक्कल लढविल्याचे दिसत आहे. वाहिनीला ठिकठिकाणी असलेल्या व्हॉल्व्हमधून कारंजा स्वरूपात अत्यंत कमी प्रमाणात पाणी बाहेर पडत असते. हे पाणी मिळविण्यासाठी त्या व्हॉल्व्हवर महिला साडी टाकतात. त्यामुळे कारंजा बंद होऊन पाण्याची एकच धार लागते. ही धार मग थेट हंडय़ात जाते. या प्रकारात एक हंडा भरण्यास साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे लागत आहेत. पाणी भरण्यासाठी अर्थातच या ठिकाणीही नंबर लावावा लागतो.
तात्पुरत्या स्वरूपात टंचाईवर मात करण्यात आर्वीकर यशस्वी झाले असले तरी अशा उपायांनी केवळ काही दिवस ढकलले जातील. परंतु त्यानंतर काय, हा प्रश्न जनतेसह प्रशासनालाही सतावत आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:46 pm

Web Title: thirst will fullfill with shortage of water
Next Stories
1 ‘विकल्प’ ठेवीदारांचा मोर्चा
2 मोसम परिसरासाठी हरणबारी डावा कालवा प्रश्न जिव्हाळ्याचा
3 नाशिक प्रकल्पीय आदिवासी उपयोजनेत ६५ कोटीने वाढ करण्याची मागणी
Just Now!
X