एकमेकांना शुभेच्छा देत, गळाभेट घेत नगरकरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षातील घडामोडींना उजाळा देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजीही झाली. जल्लोषात तरुणाईचा उत्साह अधिक होता, तो क्लब्ज, हॉटेल्स आणि ढाब्यांवरून ओसंडून वाहत होता. या उत्साहाला आवर घालण्यासाठी पोलीस पथकेही सतर्क होती. अनेकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून नवीन उपक्रमांनाही सुरुवात केली.
‘थर्टी फर्स्ट’ आणि जल्लोष हे समीकरण दरवर्षी दृढ होत चालले आहे. सनातनींनी कितीही नाके मुरडली तरीही तरुणाईने या विरोधाला जुमानलेले नाही. तरुणाईने थर्टी फर्स्टचे नियोजन गेल्या काही दिवसांपासून चालवले होते. त्याचे ‘एसएमएस’ परस्परांच्या मोबाइलमधून जात होते. मित्रमैत्रिणींचे ग्रुप जमवले जात होते. त्यामुळे काहीशा सुस्तावलेल्या बाजारपेठेलाही थोडीशी चालना मिळाली. व्यावसायिकांनीही या संधीचा लाभ उठवत वातावरणनिर्मितीस सुरुवात केली होती. सायंकाळनंतर शहरात अनेक चौकांमध्ये सीडी, डीजे लावून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. प्रशासनानेही महसुलांच्या आकडय़ांकडे लक्ष ठेवत काही सवलती दिल्या होत्या.
हे वातावरण लक्षात घेऊन पोलिसही सतर्क झाले होते. सायंकाळनंतर बंदोबस्त व गस्तीतही वाढ करण्यात आली होती. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी खास पथके तयार केली गेली होती. वाहतूक पोलिसांनीही मद्यपी व धूमस्टाईल वाहनचालकांवर कारवाईसाठी पथके नियुक्त केली होती. परमीटरुम व परवानेधारक क्लब्जला पहाटे पाचपर्यंत तर वाइन शॉपचालकांना विक्रीसाठी मध्यरात्री दीडपर्यंत परवानगी मिळाली होती.
सायंकाळनंतर जल्लोषास सुरुवात झाली, रात्रीनंतर तो वाढतच गेला. मध्यरात्री तर फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश लखलखून गेले, शहरातील अवघी तरुणाई रस्त्यावर जणू लोटली होती. सकाळी अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे फलक झळकलेले होते.