अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत तिरुवेल्लोर विद्यापीठाने मणिपूर विद्यापीठाचा ३ विरुद्ध १ गोलने सहजरीत्या पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मधुराई विद्यापीठाला ३ विरुद्ध शून्य गोलने हरवून कुरुक्षेत्र विद्यापीठाने तिसरे स्थान पटकाविले.
    येथील शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात मैदान क्र.१ वर झालेल्या या अंतिम सामन्यात तिरुवेल्लोर विद्यापीठ संघ सुरुवातीपासून आक्रमक होता. तिरुवेल्लोरच्या के. इंदुमतीने पहिला गोल नोंदवून सोळाव्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. आणखी दोन मिनिटांनी याच संघाच्या एस. प्रदीपाने दुसरा गोल नोंदविला. तर २७व्या मिनिटाला उमापती देवीने गोल नोंदवून तिरुवेल्लोरला ३ विरुद्ध शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मणिपूरच्या संघाला एकच गोल नोंदविला आला. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कुरुक्षेत्रच्या खेळाडूंनी आक्रमणावर भर ठेवत विजय मिळविला. रितू राणी, प्रियांका यांनी संघाला गोल करून दिले.
    विजेत्या संघाना श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार कुलसचिव डी. व्ही. मुळे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख पी. टी. गायकवाड, प्रा. डॉ. डी. एन. उलपे, राजेंद्र दळवी, प्रा. अमर सासने उपस्थित होते.
 त्सुनामीतून उभी राहिली आणखी एक त्सुनामी
    वेल्लोर विद्यापीठाच्या संघातील सर्व १६ खेळाडू हे सेंट जोसेफ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय, कडलूर या एकाच महाविद्यालयातील आहेत. २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांचे पालक मृत्युमुखी पडले होते. त्यांच्यापैकी १६ खेळाडू या संघात आहेत. त्यांचे पालकत्व या महाविद्यालयाने स्वीकारले आहे. हे सर्व खेळाडू आयुष्यात स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांची जबाबदारी उचललेली आहे. मात्र सरकारकडून त्यांची उपेक्षा केली जात असल्याचे त्यांच्या प्राचार्यानी सांगितले. वेल्लोर विद्यापीठाचा धडाकेबाज खेळ हा त्सुनामीरूपाने सर्वानी आज अनुभवला.