सांगोला तालुक्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या म्हैसाळ व टेंभू योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे ही कामे मार्गी लागणार असल्याने यंदाचा सांगोला तालुक्यातील दुष्काळ हा कदाचित शेवटचाच ठरावा, असा विश्वास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्य़ातून सांगोला तालुक्यात दुष्काळग्रस्त भागातील   जनावरांसाठी आणलेला चारा आर. आर. पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. वाटंबरे येथे आयोजिलेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे व जिल्हाधिकारी डॉ.  प्रवीण गेडाम हे उपस्थित होते.
गृहमंत्री पाटील म्हणाले, राज्यात १५ जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळी स्थिती असून तेथे सात लाखांपेक्षा अधिक जनावरांना चारा उपलब्ध करण्यात आला आहे. पशुधन वाचविण्यासाठी शासनाने ८५० कोटींचा खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील दुधेभावी तलावात पाणी सोडल्यास या तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाची झळ बसणार नाही. त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रा. ढोबळे व आमदार साळुंखे यांची भाषणे झाली.