सिंहस्थ कुंभमेळ्यात काम करणे ही एक संधी असून अधिकाऱ्यांनी उत्तम पध्दतीने कामगिरी करत मेळा यशस्वी करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख जवळ येऊ लागल्याने त्याप्रमाणे प्रशासनाच्या पातळीवर बैठकांना वेग आला आहे. प्रत्येक बैठकांमध्ये कामांचे स्वरूप, कामांची प्रगती आणि त्याअनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात येत असून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण हा कुंभमेळ्याच्या आयोजनातील महत्वाचा भाग असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात गांभिर्याने सहभागी होण्याची सूचनाही डवले यांनी केली. डवले यांनी कुंभमेळ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जबाबदारी देण्यात आलेल्या सर्वअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षम देण्याचे निर्देश दिले. वाहतूक व्यवस्था, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. प्रत्येक विभागाने व्यक्तिनिहाय जबाबदारीचे वाटप करून तसे नियोजन सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस आयुक्त जगन्नाथन यांनी पाण्याशी संबंधित आजारांबाबत आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना केली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.