घारापुरी ग्रामस्थांचा मात्र विरोध
पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी आयोजित केला जाणारा एलिफंटा फेस्टिवल यंदा १५ आणि १६ मार्च रोजी होणार असल्याची माहिती पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र या वर्षीचे फेस्टिव्हल एलिफंटा बेटाऐवजी गेट वे ऑफ इंडिया येथे होणार असल्याचे समजते. त्यामुळे एलिफंटा येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण त्यामुळे फेस्टिव्हलच्या उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे.
असामान्य कलाकृतींनी नटलेल्या एलिफंटा लेणी जास्तीत जास्त देशी-परदेशी पर्यटकांनी पाहावीत, या हेतूने फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे मुंबईतच मुख्य कार्यक्रम ठेवण्याची सूचना पर्यटन विभागाने केली होती.
या सूचनेला घारापुरी येथील ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र ग्रामस्थांचा विरोध डावलून या वर्षीचा एलिफंटा महोत्सव गेट वे ऑफ इंडिया येथेच घेण्याची चर्चा सुरू आहे. महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या नृत्य व संगीताचा कार्यक्रम गेटवे येथे तर कला प्रदर्शन एलिफंटा येथे भरविण्याची सूचना आहे.