रेल्वेचे अंदाजपत्रक सादर करताना उत्तर महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी खा. प्रतापदादा सोनवणे यांनी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्याकडे केली आहे. या भागातील मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्ग, धुळे-मुंबई, धुळे-पुणे, धुळे-नागपूर या रेल्वेमार्गासाठी रेल्वेगाडी, धुळे-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि तो ब्रॉडगेज करणे, धुळे रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधा, धुळे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विशेष व्यवस्था, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग आदी प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
रेल्वे प्रश्नांबरोबर आगामी कुंभमेळ्यासाठीच्या पायाभूत सुविधा व विकास कामांसाठी आधी दिलेल्या आश्वासनानुसार नाशिक व त्र्यंबकेश्वरसाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय वित्तराज्यमंत्री नभो नारायण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०१५-१६ मध्ये कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी संपूर्ण देशातून व विदेशातून भाविक, साधू-महंत, नागरिक व विदेशी र्पयटक मोठ्या प्रमाणात येतात. या सर्व भाविकांकडून कुंभमेळ्याचे औचित्य साधून ऐसिहातिक संदर्भ लाभलेल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रमुख धार्मिक स्थळांना दर्शनासाठी भेटी दिल्या जातात. उद्योगनगरी म्हणून विकसित होणाऱ्या या शहराचे शहरीकरणही मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे लोकसंख्याही वाढत असून पर्यटकांचे हे प्रमुख ठिकाण बनले आहे. नाशिक महापालिका स्थानिक नागरीक व पर्यटकांना मुलभूत सुविधा देत आहे. त्याकरिता स्वत:चा निधी खर्च केला जातो. परंतु, दीर्घकालीन विकास कामे व पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून निधी मिळणे आवश्यक आहे, याकडे खा. सोनवणे यांनी लक्ष वेधले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून विकास कामांचे नियोजन व सुरूवात करणे आवश्यक आहे. सिंहस्थासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळावा, यासाठी संसदेच्या अधिवेशनात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय वित्तराज्यमंत्री नभो नारायण यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अवघ्या काही वर्षांंवर येऊन ठेपलेला सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन विकासकामांसाठी त्वरित निधी मिळावा, अशी मागणी खा. सोनवणे यांनी केली आहे.
दरम्यान, नाशिक व धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी खा. सोनवणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिके व फळबागा ट्रॅक्टरवर पाणी आणून वाचविल्या होत्या. परंतु, या काळात जोरदार बेमोसमी पाऊस पडला. त्यामुळे उघडय़ावर पडलेला शेतीमाल, भाजीपाला, फळबागांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली शेतातील उभी नगदी पिके व रब्बी पिके उध्वस्त झाली. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे खा. सोनवणे यांनी म्हटले आहे.