‘म्हाडा’च्या घरांकडे डोळे लावून बसणाऱ्यांसाठी या वर्षी ‘अच्छे दिन’ येणार आहेत. या वर्षीच्या घरांच्या सोडतीत मागील वर्षांपेक्षा सुमारे दुप्पट घरे उपलब्ध करून देण्याचा ‘म्हाडा’चा विचार आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीप्रमाणे जाहिरातीनंतर दर कमी न करता आधीच सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्वस्त व रास्त दरात घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन ‘म्हाडा’मध्ये सुरू आहे.
मागच्या वर्षी ‘म्हाडा’च्या सोडतीत मुंबई, कोकण मंडळाची मिळून अवघी २६४१ घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे ‘म्हाडा’च्या घरांकडे डोळे लावून बसणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला होता. इतकेच नव्हे तर घरांचे दर चढे असल्याने प्रतिसादही कमी मिळाला. अखेर ‘म्हाडा’ने दरात कपात करत पुन्हा नव्याने जाहिरात दिली. त्यानंतर थोडा प्रतिसाद वाढला होता.
या साऱ्या प्रकरणापासून धडा घेऊन या वर्षी आधीच नियोजनपूर्वक घरांची संख्या आणि रास्त दर जाहीर करण्याच्या दृष्टीने ‘म्हाडा’त हालचाली सुरू झाल्या आहेत. या वर्षी बहुतांश मे महिन्यात सोडत निघेल. त्यात सुमारे ४८०० घरे उपलब्ध करून देण्यात येतील. त्यातील जवळपास एक हजार घरे मुंबईत शीव, कुर्ला, मानखुर्द आदी भागांतील असतील. तर बाकीची घरे विरार-बोळींज आणि ठाणे, वेंगुर्ला येथील असतील, यावर प्राथमिक चर्चेत सहमती झाली आहे.
घरांचे दर ठरवतानाही मागच्या वर्षी राबवण्यात आलेल्या सुधारित निकषांचा आधीच विचार केला जाणार आहे. तसेच डिझेलसारख्या वाहतुकीच्या इंधनातील कपातीमुळे सिमेंट-पोलाद आदी साधनसामग्रीच्या दरावर झालेला परिणाम लक्षात घेऊन याचा लाभ ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची घरे लोकांना तुलनेत स्वस्त-रास्त दरात मिळतील, असे संकेत आहेत.