मराठी नाटय़-चित्रपटसृष्टी, तसेच टीव्ही मालिकांमधील कलावंत, दिग्दर्शक, निर्माते सर्वसाधारणपणे दरवर्षी विविध इव्हेंट्समध्ये सहभागी होऊन ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषाची शोभा वाढवित असतात. अनेक अभिनेत्रींचे नृत्याविष्कार रसिकांना मोहून टाकत असतात. परंतु, यंदा बहुतांशी कलावंत एकत्रितपणे जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी मोठय़ा प्रमाणावर नृत्य-जल्लोष, गाण्यांचे कार्यक्रम याद्वारे रिअ‍ॅलिटी शोंमधील स्पर्धक असोत की मराठी नाटय़-चित्रपट-मालिका यांमधील अनेक कलावंत एकत्रितपणे काही इव्हेंट्समध्ये सहभागी होताना दिसतात. परंतु, यंदा मात्र अशी काही योजना नसल्याचे अनेक मराठी कलावंतांनी सांगितले. काही कलावंतांनी या वेळी सर्व सहकलाकारांच्या संगतीने नववर्ष स्वागत पार्टी करण्याचे ठरविले होते. परंतु, अभिनेता आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांनी हा बेत रद्द करण्याचे ठरविले आहे. इव्हेंट्स आयोजनामध्ये प्रायोजकांचा अभाव हेही एक कारण सांगितले जात असले तरी मराठी वाहिन्यांवर नववर्ष स्वागताचे कार्यक्रम होणार आहेत. ई टीव्ही मराठी वाहिनीवरील ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ कार्यक्रमाचा विशेष भाग २९ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. अमृता खानविलकरसह ‘कॉमेडी एक्स्प्रेस’चे सर्व कलावंत धमाली गाणी गाऊन नववर्षांचे स्वागत करणार आहेत. त्यांच्याबरोबर गायक अभिजीत कोसंबी सहभागी होणार असून एक तासाचा हा विशेष भाग दाखविण्यात येणार आहेत. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून नववर्ष स्वागताचे अनेक चांगले कार्यक्रम सादर केले जायचे. त्याच धर्तीवर वेगळी संकल्पना घेऊन झी मराठी वाहिनीवर ‘जल्लोष २०१२’ हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजता होणाऱ्या एक तासाच्या विशेष कार्यक्रमात चाळीतील नववर्ष स्वागताची पार्टी आणि त्यातली गंमतजंमत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात नम्रता आवटे, लीना भागवत, विजय पटवर्धन, मंगेश देसाई, सुप्रिया पाठारे, विकास पाटील, कुशल बद्रिके, क्रांती रेडकर  हे कलावंत चाळकरी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार असून धमाल करणार आहेत. अभिनेता-सूत्रसंचालक नीलेश साबळे याने या कार्यक्रमाची संहिता लिहिली आहे.