पुणे महापालिकेतर्फे यंदाचा ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी स्वरभास्कर पुरस्कार’ पं. शिवकुमार शर्मा यांना प्रदान केला जाणार असून गुरुवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. याशिवाय पहिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार नामदेव ढसाळ यांना प्रदान केला जाणार असून मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कारासाठी प्रा. रावसाहेब कसबे आणि काझी मुस्ताक अहमद यांची निवड करण्यात आली आहे.
महापौर वैशाली बनकर यांनी या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली. महापालिकेचे सभागृहनेता सुभाष जगताप आणि आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्ध धेंडे हेही या वेळी उपस्थित होते. महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत पुरस्कार प्रदानाच्या विविध विषयांना मान्यता देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
यंदाचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी स्वरभास्कर पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना प्रदान केला जाणार असून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पं. बिरजू महाराज हे यापूर्वीचे या पुरस्काराचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल एका कार्यकर्त्यांला महापालिकेतर्फे यंदापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कारही मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये अशा स्वरुपाचा आहे.
महापालिकेतर्फे प्रतिवर्षी मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कारही प्रदान केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाते. यंदाचा आणि गेल्या वर्षीचा असे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रा. रावसाहेब कसबे आणि काझी मुस्ताक अहमद यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच संस्था गटातील पुरस्कारासाठी विद्यार्थी सहायक समिती आणि हडपसर येथील मुस्लीम समाज प्रबोधन संस्थेची निवड करण्यात आल्याचे महापौर बनकर यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उचित स्मारक पुण्यात उभारावे असा एक प्रस्ताव शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ आणि नगरसेविका कल्पना थोरवे यांनी दिला होता. या प्रस्तावावरही पक्षनेत्यांच्या बैठकीत विचारविनिमय झाला. हरणावळ यांच्या प्रभागात (प्रभाग क्रमांक ५७) कलादालनाची निर्मिती केली जाणार असून या वास्तूला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा निर्णय पक्षनेत्यांनी गुरुवारी घेतला.