झाडांच्या व पक्ष्यांच्या जबाबदारीतून अग्निशमन दलाला मुक्त करण्याची शिफारस काळबादेवी दुर्घटनेसंदर्भातील अहवालात करण्यात आली असली तरी गेल्या आठवडय़ाभरात शहरात पडलेल्या हजाराहून अधिक झाडांसाठी अग्निशमन दलालाच धावावे लागले आहे. झाडांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने आणि सर्वात जलदरीत्या पोहोचण्याची क्षमता अग्निशमन दलाकडेच असल्याने ही जबाबदारी नजीकच्या काळात तरी इतर कोणावर सोपवली जाणार नाही.
गुरुवारपासून मुंबईत संततधार पावसाने हाहाकार उडवला आहे. पूर्व, पश्चिम उपनगरे व दक्षिण भागातून दररोज सुमारे शंभर झाडे पडल्याचे दूरध्वनी अग्निशमन दलाकडे येत आहेत. मंगळवारी आलेल्या वेगवाग वाऱ्यांमुळे तब्बल २०४ वृक्ष पडले. आठवडाभरात पडलेल्या झाडांची संख्या ७४९ वर पोहोचली तर पाऊस सुरू झाल्यापासून शहरात विविध ठिकाणी पडलेली झाडे व फांद्या यांची संख्या हजारावर आहे. या सर्व झाडांसाठी अग्निशमन दलाला धावावे लागले आहे. याशिवाय पक्ष्यांच्या सुटकेसाठीही अग्निशमन दलाकडेच दूरध्वनी येत आहेत. काळबादेवी दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल देणाऱ्या समितीने अग्निशमन दलाला पक्षी व झाडांच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा सल्ला दिला होता. झाडे उचलण्यासाठी उद्यान विभाग सक्षम असला तरी त्याखाली मनुष्यहानी तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाला पर्याय नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
झाड पडल्यावर मनुष्यहानी होण्याची भीती असल्याने आणि घटनास्थळी सर्वात आधी पोहोचण्याची क्षमता अग्निशमन दलाकडे असल्याने, इतर कोणताही विभाग यासाठी सक्षम होईपर्यंत ही जबाबदारी अग्निशमन दलावर राहील, अशी माहिती अग्निशमन दल उपप्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली. मात्र पक्षी किंवा समुद्रात गेलेल्यांची सुटका करताना जिवावरचा धोका पत्करू नये अशा लेखी सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांची सुटका करण्यासाठी २५ ते ३० फुटांपर्यंतच्या काठय़ा मागवण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी पत्र्यावर चढू नये किंवा जीव धोक्यात घालू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. याशिवाय समुद्रात प्रचंड लाटा येत असतील, रात्र असेल व परिस्थिती नियंत्रणाबाहेर असेल तर समुद्रात उतरू नये, अशा सूचना दिल्याचे रहांगदळे म्हणाले.