शहरातील वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा व्हावी या उद्देशाने शहरातील तीन वीज उपविभाग स्पॅन्को या खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आले. परंतु विशेषत: वीज बिलांच्या वाटपातील सावळागोंधळ संपलेला नाही. महावितरणतर्फे हजारो सदोष बिले ग्राहकांना पाठवण्यात आल्याचे या कंपनीने दिलेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
नागपूर शहर क्षेत्रातील महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स हे विभाग ‘स्पॅन्को’ (आता एसएनडीएल) कंपनीकडे सोपवण्यात आले असून, काँग्रेसनगर व एमआयडीसी विभाग अद्याप महावितरणकडे आहेत. स्पॅन्कोने काम हाती घेतल्यानंतर पहिल्याच वर्षांत वादळी पावसाने वीज वितरणाचे जाळे उद्ध्वस्त केल्याने या कंपनीला मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे कंपनीवर मोठी टीका होऊन तिच्याकडून हे काम काढून घेण्याचीही मागणी झाली. मात्र, महावितरणचाही कारभार फार चांगला आहे असे घडलेले नाही. १ जानेवारी २०१० ते ३१ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत चुकीची वीजबिले मिळाल्याबद्दल महावितरणच्या काँग्रेसनगर विभागातच ग्राहकांच्या ६ हजार ४८० तक्रारी मिळाल्या. या बिलांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे महावितरणने म्हटले असले, तरी बिलाची पूर्ण रक्कम भरल्यानंतरच वीजबिलाबाबतच्या तक्रारीचा विचार करण्यात येतो, हे उल्लेखनीय आहे. याच काळात वीजचोरीचे ५९६ प्रकार उघडकीला आले. बिले न भरल्याबद्दल जुलै ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत १०७ ग्राहकांचे कनेक्शन कायमस्वरूपी, तर १५ ग्राहकांचे कनेक्शन तात्पुरते कापण्यात आले, असे महावितरणने म्हटले आहे. ही आकडेवारी फक्त एकटय़ा काँग्रेसनगर विभागाची आहे, हे लक्षात घेतले तर दरमहा शेकडो चुकीची बिले दिली जातात आणि त्यामुळे ग्राहकांना मन:स्ताप होते, हे लक्षात येते. काँग्रेसनगर विभागात अवैध जोडणी घेणाऱ्यांमध्ये अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था, रामदासपेठ प्लॉट ओनर्स अँड रेसिडेंट्स असोसिएशन आणि रामदासपेठ गणेशोत्सव मंडळ या उच्चभ्रूंचा समावेश असल्याचे अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या विचारणेच्या उत्तरात महावितरणने कळवले आहे. सदोष बिलांची संख्या आणि वीजचोरीसाठी केलेली कारवाई याबाबत कोलारकर यांनी स्पॅन्कोच्या अधिकार क्षेत्रातीलही माहिती विचारली होती, परंतु ती त्यांना मिळाली नाही. नागपुरात स्पॅन्कोचे ४ लाख २१ हजार ३२१ व महावितरणचे १ लाख २२ हजार ९५० असे मिळून ५ लाख ४३ हजार ९११ ग्राहक आहेत. शहरात सर्वात जास्त विजेचा वापर करणाऱ्या औद्योगिक ग्राहकांमध्ये नागपूर अ‍ॅलॉइज कास्टिंग लिमिटेड (ऑक्टोबर २०१२च्या बिलाची रक्कम १ कोटी ६७ लाख ३४ हजार ७०० रुपये) आणि केएसएल रिअ‍ॅल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. (८३ लाख ९६ हजार ७०० रुपये) यांचा समावेश आहे.  याशिवाय ऑक्टोबर २०१२ मध्ये विजेचा शून्य युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सुमारे २५ हजार होती, असेही महावितरणने उत्तरात कळवले आहे.