‘आपण ज्यांच्याकरता कशाचीही पर्वा न करता आपले कर्तव्य बजावतो, त्या सर्वसामान्य माणसांचे प्रेम, त्यांचा सैनिकांप्रती असलेला आदरभाव त्यांच्यापर्यंत पोहोचणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या या प्रेमाच्या पाठबळावरच हजारो संकटांवर मात करण्याचे, प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहण्याचे सामथ्र्य त्यांना प्राप्त होते. त्यामुळेच औरंगाबादच्या मातृभूमी ट्रस्टच्या माध्यमातून कारगिलला जात असलेल्या कलावंतांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो,’ असे प्रतिपादन ब्रिगेडियर सुरेंद्र पावामणी यांनी केले.
औरंगाबादच्या मातृभूमी ट्रस्टच्यावतीने कारगिल तसेच बटालिक, द्रास, बयाणा, कुपथाँग या भारतीय सीमेवरील ठाण्यांमध्ये कार्यरत जवानांकरिता संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आयोजकांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा संदेश फलक उभारण्यात आले होते. त्यावर शहरवासीयांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शुभेच्छा संदेश लिहिलेल्या फलकांच्या प्रतिकृती औरंगाबाद येथील सैन्यदलाच्या मुख्यालयाला भेट देण्यात आल्या. यावेळी ब्रिगेडियर पावामणी व कर्नल इरफान, आदी उपस्थित होते.
सैनिक लढतो तो आपल्या माणसांसाठी, आपल्या देशासाठी. बर्फामध्ये, डोंगरांवर पहारा देणाऱ्या जवानापर्यंत पोहोचून त्यांची ख्याली-खुशाली विचारणे, त्यांच्यासमोर आपली कला सादर करणे, त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचविणे हे त्यांना हजार हत्तीचे बळ मिळवून देणारे ठरते. ‘मातृभूमी’सारख्या संस्थांनी असा उपक्रम राबवून खूप चांगला पायंडा पाडला आहे, असे मत कर्नल आब्दी यांनी व्यक्त केले. यावेळी मातृभूमी ट्रस्टचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी या दौऱ्याची माहिती दिली. या प्रसंगी चाटे समूहाचे अनंत सोनेकर, गिरी, गायक कलावंत राजेश भावसार, कवी राजन मंदा आदी उपस्थित होते.