14 December 2017

News Flash

‘धागा जुळला’..!

२००९ साली ‘लोकसत्ता’च्या ‘कॅम्पस मूड’तर्फे निवडणुकीनिमित्त विशेष कार्यक्रम चार-पाच महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले. त्याचा

स्पृहा जोशी | Updated: February 14, 2013 12:32 PM

२००९ साली ‘लोकसत्ता’च्या ‘कॅम्पस मूड’तर्फे निवडणुकीनिमित्त विशेष कार्यक्रम चार-पाच महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले. त्याचा समन्वयक म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती. त्या आधीपासून स्पृहा ‘कॅम्पस मूड’मध्ये होती. परीक्षेमुळे मी काही काळ ब्रेक घेतला होता. त्यामुळे या निवडणूक विशेष कार्यक्रमाच्या संकल्पनेला अंतिम स्वरूप द्यायचे होते त्या वेळी झालेल्या बैठकीमध्ये आम्ही एकमेकांना पाहिले. तीन-चार दिवस वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन अभिनेता अतुल कुलकर्णीसमवेत हे कार्यक्रम करायचे होते. त्याचे सूत्रसंचालन स्पृहा करीत होती आणि मी समन्वयक होतो. त्या तीन-चार दिवसांत झालेले बोलणे, एकमेकांविषयी थोडीशी माहिती मिळाली. विशेष म्हणजे फक्त एकाच महाविद्यालयात इंग्रजीतून कार्यक्रम करायचा होता. स्पृहाने यापूर्वी इंग्रजीतून कार्यक्रम केला नव्हता. परंतु अतिशय छान पद्धतीने तिने सूत्रसंचालन केले आणि मी भारावून गेलो. तीन-चार दिवस एकत्र घालवल्यामुळे त्यानंतर चर्चगेटला आम्ही भेटलो तेव्हा ‘कुछ कुछ होता है’ असं मला झालं होतं. मी धीर करून हे तिला सांगितले. (बहुधा तिलाही तसंच काहीसं होत असावं..)
..  मग गप्पांच्या ओघात आम्ही एकमेकांची पाश्र्वभूमी, करिअर यावर बोललो. खरं सांगायचं तर अतिशय सहजपणे सगळं घडत गेलं. मुद्दामहून आमच्यापैकी कुणीच एकमेकांना ‘फॉर्मली प्रपोज’ वगैरे केलेलं नाही. किंबहुना हेच आमच्या नात्यातलं वेगळेपण असावं. आमच्या दोघांच्याही आवडीनिवडी वेगळ्या आहेत. अभिनय-कविता-मराठी मालिका यातले मला काहीच आवडत नव्हतं. त्यापेक्षा, असल्या प्रांतात मी कधी शिरलोच नव्हतो. कवितांच्या गावा जावे.. वगैरे रौमँटिक विचार माझ्या मनात फारसे कधी घुटमळत नसत.. पण संवेदनशील स्वभाव आणि समजूतदारपणा हाच आमच्यातला समान धागा म्हणता येईल. त्यामुळे दोघांच्याही आवडीनिवडी अतिशय निरनिराळ्या, काही वेळा विरुद्ध प्रकारच्या होत्या. पण आमचं प्रेम जुळलं..
    * वरद लघाटे
.. मी बडबडय़ा स्वभावाची तर वरद खूप अबोल.  एकच एक गोष्ट सतत करत राहण्याचा मला कंटाळा तर तो स्थिरतेला चिकटून राहणारा. परंतु, दुसऱ्याचे शांतपणे ऐकून घेणे आणि पटकन, तडकाफडकी कुठलेही मत न देता, शांतपणे विचार करून त्याबाबत मत देणे हा त्याचा स्वभाव मला भावला. मी चंचल स्वभावाची आणि तो शांत स्वभावाचा असला, आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी संवदेनाशीलता व समजूतदारपणा हे साम्य असल्यामुळेच आमचे नातं जुळलं.  माझ्या भूमिकांबद्दल तो मत फारसे देत नाही, पण ‘रमाबाई’ पाहिल्यावर एकदाच वरद म्हणाला की तुझ्यातला उत्oुंखलपणा ही या भूमिकेची गरज नाहीए. तो कमी कर. यावर मी विचार केला आणि मलाही ते पटलं. दुसऱ्याला समजून घेणे हा वरदचा गुण मला आवडला. अर्थात आम्ही एकमेकांना औपचारिकरित्या ‘प्रपोज’ केले मात्र नाही. सहजपणे, एकमेकांच्या साथीने, एकमेकांना समजून घेत, ‘कॅम्पस मूड’चे काम करताना, खूप गप्पा करताना मनं जुळून गेली, आणि प्रेमाचा धागा जुळला, हेच खरं!..  
 

First Published on February 14, 2013 12:32 pm

Web Title: thread matched