अंबड औद्योगिक वसाहतीतील गौतमनगर झोपडपट्टीमधील रहिवाशांचे प्रदूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले असून याप्रकरणी त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुवर्ण लघुउद्योग व्यावसायिक व रहिवाशांना एकत्र आणून परिस्थिती समजावून देण्यात आली. करण गायकर यांनी सदर उद्योग व्यावसायिकांशी यापूर्वी चर्चा केली होती. परंतु तरीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट छावा कार्यकर्त्यांविरुद्ध औद्योगिक विकास महामंडळ तसेच पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्या संदर्भात छावाच्या कार्यकर्त्यांनी गौतमनगर झोपडपट्टी गाठून उद्योग व्यावसायिक व पोलिसांसह परिस्थितीची पाहणी केली. व्यावसायिकांना तोंडी समज देण्यात आली. याप्रसंगी अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक महानगरपालिका यांच्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. अनेक कंपन्यांमधील दरुगधीयुक्त तसेच अ‍ॅसिडयुक्त पाणी रहिवासी भागात जाते. या प्रकाराकडे लक्ष वेधले असता व्यावसायिक अहिरे यांनी अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश माळी यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसांत बैठक आयोजित करण्याचे व लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या वेळी छावा संघटनेचे
रवी भारद्वाज, बाळा खांडे, शिव तेलंग, विजय वाहुळे आदी उपस्थित होते.