डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळविण्यासाठी  अनेकदा  मागणी करूनही सरकार जुमानत नसल्याचे पाहून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर अवघ्या दहा दिवसांत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी साडेबारा एकरापकी चार एकर जमीन तातडीने दिली होती, असा गौप्यस्फोट  रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत केला.
इंदू मिलची जागा मिळविण्याचे श्रेय सर्वस्वी आमचेच आहे. बाळासाहेब आंबेडकर व  रामदास आठवले यांचे योगदानही  याकामी मिळाल्याने आमचे काम आणखी सापे झाले हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यवतमाळ विधानसभेची पाटनिवडणूक रिपाइं स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं आघाडीने २ ऑक्टोबर २००९ला जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात क्र.९ वर इंदू मिलची जमीन स्मारकासाठी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. हा मुद्दा या जाहीरनाम्यात घेतलाच पाहिजे, यासाठी  आपण आग्रही होतो. त्यामुळे जाहीरनाम्यात इंदू मिलच्या जमीन देण्याचा विषय पुढे आला. सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेकदा मागणी करूनही जमीन देण्यास टाळाटाळ सुरू होती, तेव्हा ३ सप्टेंबर २०१० ला आपण तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना एक पत्र लिहून आघाडीतून बाहेर पडण्याची  धमकी दिली होती. या धमकीमुळे सरकार जागे झाले. अवघ्या आठ दिवसाने २१ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात या विषयावर बठक घेतली व त्याच बठकीत इंदू मिलची चार एकर जमीन स्मारकासाठी देण्याचा निर्णय  झाला. साडेबारा एकर जमिनीसाठी आम्ही अडून बसलो, एवढेच नव्हे तर यासाठी विविध आंदोलने केली. शेवटी सरकारला जमीन देणे भाग पडले. हा प्रश्न आम्ही तडीस नेला, याबद्दल मनस्वी समाधान असल्याचे डॉ. गवई यांनी सांगितले.
 इंदू मिलसाठी  पक्षाने केलेल्या विविध आंदोलनाची माहिती लोकांना देऊन त्यांच्यात  जागृती  करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहोत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचे त्यांनी निसंदिग्धपणे सांगितले.
या निवडणुकीत पक्षाला विधानसभेच्या किमान १५ तर लोकसभेसाठी ३ जागा सोडाव्या यासाठी आम्ही आग्रही राहू. रिपाइंच्या एकत्रीकरणासाठी आपण आजही तयार आहोत, मात्र पहिले बाळासाहेब आंबेडकर  व रामदास आठवले यांनी आधी एकत्र यावे. रिपाइंला गृहीत धरता कामा नये, आम्ही  मुंबई व नागपूर महापालिका निवडणुकीत  पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे कुणी आम्हाला सहज घेऊ नये, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे आघाडीतील पक्षांना दिला. साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या विरोधातील दलित महिलांच्या लंगिक छळाच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी, असे सांगून या घटनेचा त्यांनी निषेधही नोदविला. पत्रकार परिषदेला रिपाइंचे राज्य अध्यक्ष  सुबोध वाघमोडे (सोलापूर), जिल्हाध्यक्ष राजेंद्र हेडवे, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. अरुण मोहोड, अमरावती महापालिकेचे नगरसेवक भूषण बन्सोड, बंडोपत राऊत, अ‍ॅड. सोपान कांबळे,  अ‍ॅॅड. जयपाल पाटील, गजेंद्र गणवीर, तालुकाध्यक्ष भारत मनवर, पुरुषोत्तम पिसे, अ‍ॅड. श्याम खंडारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.