दुष्काळात वन्यजीवन होरपळले
दुष्काळाच्या वणव्यात मराठवाडय़ातील वन्यजीवन चांगलेच होरपळत असून, तहानलेले प्राणी पाण्यासाठी शहरांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, पाणी पाणी करीत शुक्रवारी दिवसभरात ३ प्राण्यांचा मृत्यू झाला, तर एक अत्यवस्थ हरीण मृत्यूशी झुंज देत आहे.
गेल्या ३ वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. जनतेला टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी तहानलेल्या वन्य प्राण्यांना कोणताही पर्याय नसल्याने ते शहरांकडे धाव घेत आहेत. मराठवाडय़ात सर्वाधिक वनसंपदा किनवट-माहूर तालुक्यांना लाभली आहे. या दोन्ही तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात जंगल आहे. भोकर व मुदखेड तालुक्यांतही जंगलाचे प्रमाण काहीअंशी का होईना आहे. विविध वृक्षांप्रमाणे या जंगलात वेगवेगळ्या जातीचे प्राणी मोठय़ा प्रमाणावर राहतात. जंगलातील प्राण्यांची गणती २००५मध्ये झाली. तिचा अधिकृत अहवाल मिळाला नसला, तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जंगलात वाघ, नीलगाय, बिबटे, भेकर, अस्वल, रानकुत्रे, हरीण, सायाळ, रानमांजरे, ससे, कोल्हे, मुंगुस, मोर, लांडगा, काळवीट, चिंकारा, रानडुक्कर, जंगली कोंबडे असे प्राणी मोठय़ा प्रमाणावर आहेत. वाघ एकच असला, तरी अन्य प्राण्यांची संख्या मात्र मोठी आहे. किनवट-माहूर तालुक्यांतल्या वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पैनगंगाचे वरदान आहे. पण पैनगंगातल्या पाण्याने आधीच तळ गाठल्याने, तसेच जंगलातील पिण्याच्या पाण्याचे अन्य स्रोत आटले. परिणामी हे  प्राणी रस्त्यावर येऊ लागले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. माहूर-किनवट तालुक्यांत १०० टक्के पाऊस पडला असला, तरी नांदेडलगतच्या भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पाणीस्रोत कोरडेठाक पडले आहेत. पर्यायाने पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राणी शहरांकडे येऊ लागले आहेत. पाण्याच्या शोधात वस्त्यांकडे येणारे हे प्राणी आपला जीव मुठीत घेऊन येत असले तरी अनेकवेळा त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. काल दिवसभरात एक माकड, एक नीलगाय व एका घुबडाचा मृत्यू झाला. माकड विहिरीत पाणी पिण्यास उतरले व बुडून मरण पावले. हरीण रस्ता ओलांडताना जखमी झाले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पण हरीण आता मृत्यूशी झुंज देत आहे. वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सरकारकडे कोणतीही तरतूद नाही. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यक्रियेसाठी सरकार पैसा देत नाही. पिण्याचे पाणी आटल्याने शहरालगतच्या वस्त्यांमध्ये माकडे आली आहेत.
पाण्यासाठी आलेल्या या माकडांचे चाळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली, तरी त्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही आर्थिक तरतूद नाही. जंगलात पिण्याचे पाणी नाही तर शहरात अनेक धोके आहेत. या पाश्र्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी वन्यप्रेमी नागरिकांनी केली.