दुर्मीळ सापांची (मांडुळाची) तस्करी करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चार मांडूळ जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे. हा साप घरात ठेवल्याने धनप्राप्ती होते अशी अंधश्रद्धा पसरवत या टोळीकडून या सापांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनीदेखील या सापाची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता.
फिरोज रसूल खान, रोहित ओमप्रकाश मिश्रा आणि अनिल किशोर जाधव अशी आरोपींची नावे आहेत. खान आणि मिश्रा मूळचे उत्तर प्रदेश असून जाधव हा सांगलीचा आहे. खारघर येथे या सापांच्या विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार गुरुवारी रात्री खारघर येथील लिटिल मॉल परिसरात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत पोलिसांना चार साप आढळून आले. तर दुसऱ्या बॅगेत वजने, मापे आणि सलाइन आदी साहित्य मिळून आले आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.