भिवंडी येथील फ्युचर ग्रुप कंपनीचा सुमारे ५२ लाखांचा ऐवज नागपूरला पाठविण्याऐवजी त्याचा अपहार केल्याप्रकरणी कंटेनरचालकासह तीन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून ४७ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कंटेनर चालकाने नोकरीसाठी दिलेला वाहन परवाना बनावट असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. लालबहादूर ऊर्फ सोनू ऊर्फ बबलू माया सिंग (कंटेनरचालक), शिंपलाप्रसाद ऊर्फ पंडित राजनाथ तिवारी (४०) आणि अब्दूल ऊर्फ राजू वहाब अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. भिवंडी येथील श्री मयूरेश्वर ट्रान्सपोर्टच्या कंटेनरमधून देशात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचा ऐवज पाठविला जातो. या कंपनीला भिवंडी येथील फ्यूचर ग्रुप कंपनीने ५२ लाखांचा ऐवज नागपूरला पाठविण्याचे काम दिले होते. त्यामध्ये जीन्स पॅन्ट, कपडे, वातानुकूलित संच व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदींचा समावेश होता. २५ मार्च रोजी लालबहादूर हा कंटनेर घेऊन नागपूरला रवाना झाला होता. त्याच दिवशी रात्री लालबहादूरने ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक मिलिंद वडके यांना दूरध्वनी केला आणि शहापूर येथे पोलिसांनी कंटनेर अडविला असून ते सोडत नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहाणी केली असता, त्यांना रिकामा कंटेनर आढळला. तसेच तिथे लालबहादूर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मिलिंद वडके यांनी या प्रकरणाचा तपास भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेला करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश राऊत यांच्या पथकाने तपास करून या तिघांना अटक केली. या तिघांनी वाडा तसेच मुंब्रा भागातील गोदामांमध्ये कंटेनरमधील ऐवज ठेवला होता. त्यापैकी ४७ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.