गावात फेरीवाल्यांचे सोंग घेऊन रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेश ऊर्फ खुनून छिलटुराम सिसोदिया राजपूत ठाकूर (२०, रा. डोंगालिया, मध्यप्रदेश), प्यारेलाल देवलाल कुंभरे (३५) आणि राजू देवलाल कुंभरे (२६,रा. मुंढरई, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना तपासाकरिता सालेकसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चोरीच्या गुन्ह्य़ातील कारागृहातून सुटका झालेल्या आरोपींवर पाळत ठेवण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे सुरेश भोयर यांनी विशेष अभियान राबविले. त्यांनी आपल्या पथकासह राजेश प्यारेलाल आणि राजूवर पाळत ठेवली.
ते दिवसभर रुद्राक्ष, शृंगाराचे साहित्य आणि बेन्टेक्सचे साहित्य विक्री करण्यासाठी गावात फिरायचे. दिवसा पाहणी करून रात्री चोरी आणि घरफोडीचे बेत साध्य करायचे. तीनही आरोपींचा वावर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
 गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना रविवारी अटक केली. आरोपी परराज्यातील असून घरफोडय़ा करण्यात सराईत आहेत. त्यांच्यावर लगतच्या राज्यातील राजनांदगाव, रायपूर, शिवनी अशा ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
 अटकेत असलेल्या आरोपींनी २९ जूनला नवेगाव-बाम्हणी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर घरफोडीतील साहित्य आमगाव खुर्द, सालेकसा आणि हर्िी-किरणापूर येथील सराफा व्यावसायिकांना विकल्याची कबुली दिली.
ही कारवाई सुरेश भोयर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर, सहायक फौजदार नवखरे, हवालदार अर्जुन कावळे, ब्राम्हणकर, शंकर साठवणे, रामलाल सार्वे, संतोष काळे, भुवनलाल देशमुख, अजय सव्वालाखे यांनी पार पाडली.