रेल्वेच्या मालकीची लाखो रुपयांची तांब्याची तार (ओव्हरहेड केबल) चोरी करणाऱ्या व दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघा अट्टल गुन्हेगारांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिका-यांनी अटक केली. त्यांना आज नाशिकच्या कारागृहात पाठविण्यात आले.
दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे सध्या विद्युतीकरण सुरू आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात तांब्याची तार वापरली जाते. ही तार तोडून चोरणाऱ्या पाच जणांना रेल्वे पोलिसांनी सन २०१२ मध्ये पकडले होते. त्यातील तीन जण फरार होते. या तिघांना रेल्वे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. बाळ पवार (रा. शिरसगाव), सखाराम दहाडे व सोमनाथ मोरे  (दोघे रा. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पवार व दहाडे यांना श्रीरामपूर शहरातच पकडले तर मोरे यास कुकाणा येथून अटक करण्यात आली. यातील पवार हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडे, बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रेल्वे पोलीस दलाचे उपनिरीक्षक बी. पी. मीना, कर्मचारी एम. के. व्यवहारे, पवन सर्जेकर, राजेश मिश्रा आदींनी ही कारवाई केली. दि. २४ पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.
तांब्याची तार चोरणारी ही टोळी तार चोरण्यात अत्यंत तरबेज आहे. या तारांमध्ये उच्च दाबाची वीज वाहात असतानाही ते तार तोडतात. अशाप्रकारे तार तोडताना २०१२ साली विजेचा धक्का बसून त्यांच्या एका साथीदाराचा मृत्यूही झालेला आहे. कान्हेगाव, श्रीरामपूर, पुणतांबा, राहुरी आदी ठिकाणी या चोरांनी अक्षरश: हैदोस घातला होता. या ठिकाणांहून लाखो रुपयांची चार चोरलेली आहे.