News Flash

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक

ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री कामठीमधील भाजीमंडीत एका घरावर छापा मारून इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तीन बुकींना अटक

| June 19, 2013 09:18 am

ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री कामठीमधील भाजीमंडीत एका घरावर छापा मारून इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तीन बुकींना अटक केली.
कामठीमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन पाली, उपनिरीक्षक प्रशांत बरपे, दिनेश लांबाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल कामठीत डेरा टाकला.
सट्टा रावला जात असल्याचे ठिकाण या पथकाने हुडकून काढले. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कामठीमधील भाजीमंडीमधील एका घरावर या पथकाने छापा टाकला. एका घराच्या चेतन बांगरे (रा. भाजीमंडी कामठी), इरफान शेख व हेमंत मेघलानी (दोन्ही रा. नागपूर) हे तिघे मोबाईलवरून सट्टय़ाच्या नोंदी घेत होते.
आयपीएलच्या सहाव्या पर्वात मोठय़ा प्रमाणावर स्पॉट फिक्सिंग झाल्यानंतर नागपुरातील सुनील भाटिया आणि छोटू अग्रवाल या दोन बडय़ा बुकींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे नागपुरातील सट्टेबाजांनी छोटय़ा शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात जाऊन व्यवसाय सुरू केला आहे. नागपूर पोलीस मागावर असल्याने त्यांनी  गुन्ह्य़ाची कार्यपद्धती बदलून नव्या पद्धतीने सट्टा लावणे सुरू केले होते. याची खबर गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सापळा रचून तीन बुकींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून लॅपटॉप, १२ मोबाईल फोन आणि टीव्ही संचासह ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. कामठीत अशा प्रकारची ही पहिली कारवाई असल्याने सनसनी निर्माण झाली आहे.
या बुकींचे अटकेतील बडय़ा बुकींबरोबर संबंध असल्याची चौकशी केली जात आहे. बांगरे कामठीतील बोकारे चौकातच घर आहे. येथूनचा सट्टा लावला जात होता. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नागपुरातील आणखी काही बुकी यात सामील असल्याचा संशय असून कामठीला त्यांनी सट्टय़ाचा अड्डा बनविल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
कामठीतील छाप्यात पोलीस शिपाई जय शर्मा, प्रमोद बनसोड, अमोल नागरे, कालिदास अंबर्डे यांनी भाग घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 9:18 am

Web Title: three bookies arrested in nagpur
Next Stories
1 मॅनहोल्समुळे महापालिकेचे पितळ उघडे
2 विदर्भातील प्रकल्पांमधील जलसाठय़ात अडीच टक्के वाढ
3 ‘किस्सा’ माणिकराव गावितांच्या मंत्रिपद गेल्याचा!
Just Now!
X