मुरमाडीतील तीन बहिणींच्या हत्याकांडाचे पडसाद देशभर उमटल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी फॉरेन्सिक अहवालानुसार मुलींवर बलात्कार झाला किंवा नाही, हे स्पष्ट होत नसल्याचे सांगून शास्त्रीय माहिती मिळाल्यानंतरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे सांगितले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांमध्ये पीडित कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
तीन बहिणींवर बलात्कार झालाच नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असतानाच  बलात्कारासंबंधी ५० टक्के शक्यता असल्याचे आरती सिंग यांनी सांगितले. बलात्कार झाला किंवा झाला नाही याविषयी अद्यापही स्थिती स्पष्ट झालेली नाही, हे महत्त्वाचे.
दरम्यान, आज पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी हत्याकांडातील तपासाचा कानोसा घेतला. पोलिसांसोबत चर्चा करून तपासाविषयी सूचना दिल्या. मुलींचे मृतदेह हाती लागून तब्बल पंधरवडा उलटला आहे. मात्र अद्याप कुणाला अटक झालेली नाही. मुलींवर बलात्कार न झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता पोलिसांना हत्याकांडामागच्या विविध कारणांचा छडा लावण्यासाठी लक्ष्य गाठण्यास योग्य संधी आहे, असेही म्हटले जात आहे. तनुजा, प्राची आणि प्रिया या बोरकर भगिनींचे मृतदेह १६ फेब्रुवारीला एका विहिरीत मिळाले. त्यानंतर पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नसल्याने लोकांमध्ये रोश आहे.
शिवाय विविध राजकीय पक्ष लाखनी बंदचे आवाहन करीत असल्याने लोकांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झालेला आहे. सततच्या आंदोलनामुळे लोक कंटाळले आहेत. मुलींच्या खुन्यांना अटक करून जबर शिक्षा व्हावी, अशी सार्वत्रिक मानसिकता आहे.

आईने मौन तोडले
आज पहिल्यांदाच मुलींची आई माधुरी बोरकर यांनी मौन तोडून आरोपी मिळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी  दाखवली. पोलिसांनी अद्यापही गुन्हेगारांचा शोध लावला नसून त्यांच्यावर माझा विश्वास नाही. मुलींसाठी आंदोलन करीन आणि त्यासाठी महिलांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.