तीन बिबटय़ांवर विषप्रयोग करून, त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून माहूर तालुक्यातील नथु माधव पाचपुते (दिगडी) याला माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. के. खराटे यांनी १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
वन्यजीव संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार घोरपड हत्या प्रकरणात एकाला नुकतीच शिक्षा झालेली असताना, बिबटय़ांच्या सामूहिक हत्याकांडात आरोपीला शिक्षा होण्याची जिल्ह्य़ातील ही पहिलीच घटना असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
आरोपी नथु पाचपुते यांच्या गायीच्या वासराचा तीन बिबटय़ांनी फडशा पाडल्याची घटना वरील गावात एप्रिल २०१०मध्ये घडली. यानंतर आरोपीने मृत वासराच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांवर डुनेट नावाचे विषारी औषध फवारले. नंतर ३ बिबटय़ांनी ते विषयुक्त अवशेषही खाल्ल्यामुळे १२ एप्रिल रोजी आरोपीच्या शेतीतील नाल्यात तिन्ही बिबटे मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनरक्षक पांडुरंग साळवे यांनी विभागाला कळविली. मृत बिबटय़ांचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. सायन्ना अनलोड यांनी केले असता विषबाधाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच वेळी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम ९ व ५१ (१) अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रकरणाचा तपास शिवाजी बिन्नर यांनी केली. त्यावेळी आरोपी नथु पाचपुते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने विष प्रयोगाची कबुली दिली. न्यायालयात हे प्रकरण दाखल झाले. या प्रकरणात १२ साक्षीदार तपासण्यात आले. पशुवैद्यकांचा अहवाल महत्त्वाचा होताच; पण आरोपीने ‘डुनेट’ हे विषारी औषध ज्या दुकानातून खरेदी केले होते. त्या दुकानदाराची साक्ष निर्णायक ठरली, असे वन परिक्षेत्र अधिकारी एस. आय. भंडारे यांनी सांगितले.
सरकार पक्षातर्फे सादर पुरावे व साक्षी ग्राह्य़ ठरवून न्यायदंडाधिकारी खराटे यांनी नथ यास दोषी ठरवत वरीलप्रमाणे शिक्षा दिली. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अॅड. टी. एन. पाटील यांनी मांडली. बिबटय़ांच्या हत्या प्रकरणात शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.