दीड वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेची फसवणूक केलेल्या प्रकरणाचा तपास लागत नसल्याने या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला, या प्रस्तावाची चौकशी करताना अवघ्या आठ तासांमध्ये याप्रकरणाचा छडा सहायक पोलीस आयुक्तांनी लावला. आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. तपासाअंती बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकांना गंडा घालणाऱ्या मोठय़ा त्रिकुटाचा पर्दाफाश झाला आहे.
खारघर येथील इको बॅंकेच्या वाहनकर्जाबाबत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या दिड वर्षांपासून या प्रकरणाचा छडा सहायक पोलीस निरीक्षक संजय जाधव हे लावू शकले नाही. अखेर जाधवांनी या प्रकरणाचा निपटारा लावण्यासाठी हे प्रकरण फाईलबंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे धाडला. त्यानंतर या प्रकरणाचे सत्य उघडकीस आले. सहायक पोलीस आयुक्त शेषराव सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे आणि पोलीस अबु जाधव यांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात बनावट कागदपत्राने एका त्रिकुटाने इको बॅंकेकडून वाहनकर्ज काढले होते. त्यानंतर ही वाहने परस्पर विकली होती. वाहने स्वस्त किमतीमध्ये मिळत असल्याने ही वाहने हातोहात विकली गेली. जी वाहने विकली गेली नाही. ती विकण्यासाठी कोपरखैरणे येथे एक मोटार विक्रीचे दुकानही या टोळीने थाटले होते. या त्रिकुटाने रस्त्यामध्ये सापडलेल्या पॅनकार्डच्या आधारे अनेक व्यक्तीचे इतर कागदपत्र बनविल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. भूषण पवार, मनोज भानुशाली आणि दत्ता घनदाट अशी या प्रकरणात पकडलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार घनदाट असल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. घनदाट हा गेल्या अनेक वर्षांपासून वाहनांसाठी बॅंकेतून कर्ज काढून त्याचे एक दोन हफ्ते भरुन तो त्या वाहनांची विक्री करतो. वाहनांचा ताबा घेण्यासाठी गेल्यावर बॅंकेच्या वसूलीपथकाला अशा नावाची व्यक्ती संबंधित पत्यावर राहत नसल्याचे कळते. अशा अनेक प्रकरणांमध्ये घनदाटला पोलीसांनी काही वेळेपुरती चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. मात्र वेळोवेळी पोलीसांशी आलेल्या संबंधामुळे पोलीस समोर आल्यावर वेळमारुन नेण्याची कला घनदाटला अवगत झाल्याने तो गेल्या दहा वर्षांपासून अनेक पोलीसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला होता. इको बॅंकेचे १३ लाख रुपयांच्या फसवणूकीपैकी एक वाहन पोलीसांनी जप्त करुन तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या त्रिकुटाने कर्नाटक बॅंकेची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे पोलीसांच्या उलटतपासणी समजले. पुणे जिल्ह्य़ात राहणारा घनदाट हा बारावी नापास आहे. बॅंकेचा एखादा कर्मचारी या प्रकरणात शामिल आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. हे प्रकरण बंद करण्याचा प्रस्ताव पाठविणारे पोलीस अधिकारी जाधव यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठविला आहे.