पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील तीन कर्मचाऱ्यांना विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले आहे. या तीन कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली होती.
पूना कॉलेजमधील डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट उघड झाल्यावर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विद्यापीठातर्फे माजी पोलीस अधिकारी शरद अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांनंतर आपला अहवाल सादर केला असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विद्यापीठ प्रशासनाला केली आहे.
अवस्थी म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिले जात असल्याचे समोर आले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळू शकतील एवढेच गुण या कर्मचाऱ्यांकडून वाढवून दिले जात होते. अशा प्रकारांमुळे विद्यापीठाचे नाव बदनाम होत असल्याने या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. ’’ यापूर्वीही अशा प्रकरणांवर विद्यापीठातर्फे समित्या स्थापन करून त्यांचे अहवाल मागविण्यात आले होते. परंतु अहवालांनुसार कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आता अवस्थी समितीच्या अहवालावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सी. एम. चितळे हेदेखील १५ दिवसांच्या रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार रसायनशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. ढवळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ढवळे यांच्याकडूनही यासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.