जागीच मृत्यू, परिसरात दहशत
पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणाहून जवळ असलेल्या वनविकास महामंडळाच्या जंगलात काडय़ा वेचण्यासाठी गेलेल्या सुनीता दीपक चितारलेवार (३०) या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
पोंभूर्णाजवळच चिंतामणी महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला वनविकास महामंडळाचे जंगल आहे. या जंगलात गावातील महिला काडय़ा, मोह, बोर व बेलफळ वेचण्यासाठी जातात. आज सकाळी गावातील सहा ते सात महिला नेहमीप्रमाणे काडय़ा वेचण्यासाठी गेल्या होत्या. काडय़ा वेचता वेचता त्या दूरवर जंगलात निघून गेल्या. तेथून परतताना रस्त्यात कक्ष क्रमांक ९५ बी मध्ये या महिलांना पट्टेदार वाघ आडवा झाला. या वाघाने समोर उभ्या असलेल्या सुनीता दीपक चितारलेवार या महिलेवर हल्ला चढविला. यात सुनीताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुनीता व वाघात झटापट सुरू असताना तिच्या सोबतच्या महिला गावात पळत आल्या. त्यांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच सहायक उपवनसंरक्षक उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी उके, तसेच वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
तेथे बघितले असता सुनीताचा मृतदेह पडून होता आणि वाघ जंगलात निघून गेलेला होता. या घटनेमुळे परिसरात दहशत व भीतीचे वातावरण आहे.
पंचनामा केल्यानंतर वन विभागाने सुनीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंडपिंपरी येथे आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला, तसेच वन विभागाच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत सुध्दा करण्यात आली. या परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून वाघ रस्त्याने फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. याच माहितीच्या आधारावर वन विभागाने गावकऱ्यांनी विशेषत: महिलांनी जंगलात अधिक आत जाऊ नये, अशी दवंडी पिटली होती, तसेच पोस्टर, स्टिकर व स्पीकरच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. मात्र, तरी सुध्दा गावकरी व महिलांनी जंगलात जाणे सोडले नाही. त्याचाच परिणाम आज सुनीताचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.