प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी याने स्वरबद्ध केलेला व एल.एम. म्युझिकची निर्मिती असलेला ‘क्षण अमृताचे’ हा अल्बम येत्या गुरुवारी प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ पाश्र्वगायिका लता मंगेशकर यांनी त्यात दोन गाणी गायल्याने सलीलचे एक स्वप्न पूर्ण झाले. त्यानिमित्त वृत्तान्तशी त्याने खास संवाद साधला.

लहानपणापासून आपली एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असते. गाण्यातलं माझं श्रद्धास्थान होतं ते अर्थातच, लतादीदी म्हणजे लता मंगेशकर. दीदींनी आपल्याकडे गावं, असं प्रत्येक संगीतकारालाच वाटतं. माझंही ते स्वप्न होतं. मी स्वरबद्ध केलेली एक ओळ जरी दीदींनी गायली तर किती मजा येईल, असं मी नेहमी मित्रांजवळ बोलायचो. मात्र, त्यासाठी मी कधीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. मात्र, संधी मिळेल तिथे म्हणजे कार्यशाळा घेताना, ‘सारेगमप’मध्ये परीक्षक म्हणून काम करताना मी जे काही मार्गदर्शन करायचो तेव्हा त्यांच्याच गायकीचे महात्म्य सर्वाना सांगत असे. शब्दांना भावनांमध्ये गुंफण्याचं कसब, श्वासावरील प्रभुत्व, लयीत गाणं आदी त्यांची वैशिष्टय़े मी नेहमीच मांडत आलो. गुलाम हैदर, सज्जाद हुसेन यांच्यापासून ए. आर. रेहमानपर्यंत सगळ्या संगीतकारांकडे दीदींनी गाणी गायली आहेत. त्यांची गायकी अद्भुत वाटावी अशीच आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या संगीत दिग्दर्शनात गाणं म्हणणं हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी निमित्त ठरलं ते ‘मत्र जीवांचे’ या कार्यक्रमाचं. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मी साधारण गेले वर्षभर हा कार्यक्रम करतोय. एकदा या कार्यक्रमाच्या मध्यंतरात हृदयनाथजी मला म्हणाले की तुमचं ‘संधीप्रकाशात’ हे गाणं दीदीच्या आवाजात हवं होतं नाही? मी हसून त्यांना म्हणालो, ‘खरंच किती छान वाटलं असतं नाही त्यांच्या आवाजात..’ तो विषय तिथेच संपला. त्यानंतर काही दिवसांनी पंडितजी मला म्हणाले, ‘हे गाणं दीदींच्या आवाजात करायला हवं’. तेव्हाही मी त्यांचे विनम्रपणे आभार मानले. तुम्हाला ही चाल एवढी आवडली हीच मोठी दाद आहे, असं मी त्यांना म्हणालो. मात्र, काही दिवसांनंतर पंडितजींनी मला थेट फर्मानच सोडलं, उद्या-परवा कधी वेळ असेल तेव्हा या गाण्याच्या तालमीसाठी दीदीला भेटा. मी तिला सांगून ठेवलं आहे. आपण ही गाणी ध्वनीमुद्रित करतोय. एल. एम. म्युझिकसाठी तुम्ही हा अल्बम करावा, अशी आमची इच्छा आहे. हे सगळंच अनपेक्षित होतं, स्वप्नपूर्तीचा आनंद होताच, मात्र दीदींना गाणं ऐकवण्याचं नवं आव्हान समोर आलं.
दीदींना यापूर्वी अनेकदा भेटलो होतो, जुजबी हितगुजही झालं होतं, तुम्ही बाळसोबत कार्यक्रम करता ना, ‘सारेगमप’मध्ये तुम्ही छान बोलता वगरे कौतुक त्यांनी केलं होतं. मात्र, असं बोलणं वेगळं आणि हार्मोनियम घेऊन त्यांना चाल सांगणं वेगळं. अक्षरश: थरकाप उडाला होता, आयुष्यात एवढं दडपण कधीच आलं नव्हतं. त्यांनी ते जाणवू दिलं नाही, हा भाग वेगळा. मात्र, आपली चाल त्या ऐकतायत, ही गोष्टच विलक्षण होती. उत्तेजित करणारी होती. संगीतकाराकडून गाण्याची चाल समजून घेण्याची त्यांची पद्धत थक्क करणारी वाटली. शांतचित्ताने आणि एकाग्रपणे त्यांनी माझं गाणं एकलं. माझं गाणं संपलं तेव्हा मला जाणवलं की त्यांनी ती चाल आत्मसात केली आहे. त्यांना ती पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. आजवर अनेक गायक-गायिकांना मी चाल समजावून सांगितली आहे, मात्र एवढी ग्रहणशक्ती कोणांतच आढळली नाही. या गायिकेने स्वत:ला केव्हाच सिद्ध केलं आहे. तरीही गाण्याशी असलेली त्यांची निष्ठा, नवीन शिकण्याची तळमळ स्तिमित करणारी आहे. त्यांना चाली आवडल्या आणि या अल्बममधील ही दोन गाणी त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. पहिल्या गाण्याला त्यांनी सुरुवात केली तेव्हा तो दैवी आवाज ऐकून अंगावर अक्षरश: काटा आला. या दोन्ही रचना बा. भ. बोरकर यांच्या आहेत. माझ्या कविता कधी गाणार?, असं बोरकर त्यांना नेहमी विचारत असत. तो योग आता जुळून आला. या दोन गाण्यांचं आणखी वैशिष्टय़ म्हणजे, त्यांच्या वयोमानाला आणि त्या ज्या उंचीवर पोहोचल्या आहेत, त्याला साजेसं हे काव्य आहे. खुद्द दीदींनी याची पावती दिली. तुम्ही निवडलेल्या कविता खूप छान आहेत आणि त्यांना दिलेल्या चालीही खूप सुंदर-समर्पक आहेत, अशी दाद त्यांनी दिली. आपल्या दर्जेदार संगीत परंपरेशी प्रामाणिक राहून केलेल्या या संगीतरचनांचं खुद्द स्वरसम्राज्ञीने केलेलं कौतुक जन्मभर पुरणारं आहे. अमृताचे हे क्षण न सरणारे आहेत.
प्रत्येक गाणं म्हणजे परीक्षा
पहिल्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्यावेळी दीदी मला म्हणाल्या तुम्हाला सांगू का, आजही ध्वनिमुद्रणासाठी घरून निघताना मला परीक्षेला जाते आहे असंच वाटतं, त्यावर मी त्यांना म्हणालो, हजारो परीक्षा देऊनही असं वाटतं का? त्यावर त्या म्हणाल्या,‘हो, कारण या परीक्षेचा पेपर कधीच फुटत नाही आणि तो आपल्यालाच सोडवायचा असतो..’. या अल्बमच्या निमित्ताने त्यांच्याकडून खूप शिकता आलं.