मुलांच्या परीक्षा संपल्याने दिवसभर दंगामस्ती करणाऱ्या मुलांमुळे पालकांची डोकेदुखी वाढू लागली पालक सध्या असून विविध उन्हाळी शिबिरांच्या शोधात भटकत आहेत. मुलांच्या वाढत्या मागण्या आणि वाढवून ठेवलेल्या कामांमुळे गृहिणींच्या शिस्तबद्ध कामांना तडा जावून आता तीच कामे दुपार गाठू लागली आहेत. सारखे मुलांच्या तालमीत गृहिणींना रहावे लागत असल्याने दुपारची झोप आणि मालिकांकडेही कानाडोळा करावा लागत आहे तर दुसरीकडे पगारदार वर्गालाही सारखे घरी फोन करून मुलांचा हालहवाला घ्यावा लागत आहे. त्यामुळेच मुलांना सुटी लागल्याबरोबरच पालकांचे वेळापत्रक बदलू लागले आहे.
पालकांनी आता उन्हाळी शिबिरांची विचारपूस करणे, जागेवर भेट देणे, शुल्क, वेळ ठरवण्याची कामे त्यांनी सुरू केली आहेत. स्केटिंग, पोहणे, कराटे, वॉलीबॉल, बॅटमिंटन, योगा, कबड्डी, कॅरम, चित्रकला आणि नृत्य आदींची स्वतंत्र शिबिरे किंवा एकत्रित शिबिरांची पालक आणि पाल्यांनी निवड केली आहे. सकाळी सहा ते दहापर्यंत आणि सायंकाळी पाच ते ७.३०पर्यंत सामान्यपणे शिबिरांची वेळ आहे. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून बंदिस्त ठिकाणीही दुपारी ४ वाजल्यापासून शिबिरे सुरू
होतात.
मुले दिवसभर दंगा करतात म्हणून काही काळ त्यांचा मन:स्ताप दूर व्हावा म्हणून उन्हाळी शिबिरांचा उपाय शोधणाऱ्या पालकांबरोबरच पाल्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठीही काही पालक जाणीवपूर्वक उन्हाळी शिबिरांचा लाभ पाल्याला मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत. मुलांनी शिबिरे, खेळ, अवांतर वाचनात वेळेचा सदुपयोग करावा, अशी पालकांची मनीषा असते. रहदारी सुरु व्हायच्या आत स्केटिंगचे उन्हाळी वर्ग सकाळी सहा वाजता सुरू होतात. तशी काही वर्गाची सुरुवात झाली आहे. पाच ते १४ वयोगटातील मुले स्केटिंग, पोहणे, कराटे, बॅटमिंटन या शिबिरांना पसंती देतात. सोबत योगा, चित्रकला, नृत्य असले तर आणखी चांगले.
उन्हाळी शिबिरांचे शुल्क २५० ते १,००० रुपये महिना आहे. मानेवाडा बेसा मार्गावरील गीतानगरातील नागपूर सुधार प्रन्यास समाजभवनात अशीच शिबिरे आयोजित करण्यात आली असून २० ते ३० जूनपर्यंत ते चालतील. दुपारी ३.३० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या भागातील विद्यार्थी दरवर्षीच चढाओढीने शिबिरात भाग घेतात. पालकांनाही मुलांपासून थोडावेळ तरी फुरसत हवी असते. त्यावेळी शक्यतो दुपारी चार ते सायंकाळी ७.३०ची वेळ पालकांना सोईची ठरते, अशी माहिती धनश्री ढोके यांनी दिली.