वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये टिप्पर टोळीच्या काही सदस्यांचा समावेश आहे. या टोळीने न्यायालयाच्या आवारात पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली होती. आता ही टोळी कारागृहात धुडगूस घालत असल्याचे उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी या कारागृहात एका कैद्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. मंगळवारी दुपारी कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. सादिक सलिम मेमन हा एका गुन्ह्यात संशयित आहे. त्याची रवानगी सध्या नाशिकरोड कारागृहात आहे. दुपारच्या सुमारास तो आपल्या बॅरेकमध्ये असताना एक कैदी त्याला चार क्रमांकांच्या बॅरेककडे घेऊन गेला. तेथील कैद्याने जावेद पठाणला का मारले अशी विचारणा करत सादिकला मारहाण करण्यास सुरुवात केली. चार ते पाच कैद्यांनी हत्याराने डोळ्यावर वार केले. यामुळे सादिक खाली कोसळला. ही घटना पाहून कैदी अंजुम मकरानी याने मध्यस्थी केली. त्याच्यावर मलमपट्टी करून ही घटना कोणाला सांगू नको असेही सांगितले. सादिकने ही बाब वरिष्ठ  अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानुसार समीर नासीर पठाण, बाळू भीमराव डोके, विजय नंदलाल रहांगळे, सुनील राजाराम शेलार, सोमनाथ भिकाजी कदम, संदीप गोपीनाथ दोंदे अशा सहा जणांनी मारहाण केल्याचे सादिकने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपूर्वी एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामागील कारणांची स्पष्टता झाली नसताना कैद्यांमधील मारहाणीचा हा प्रकार समोर आला. काही महिन्यांपूर्वी कारागृहातील दोन कैदी सुरक्षा व्यवस्थेला चकमा देऊन पसार झाले होते. तत्पूर्वी, कारागृहातील कैद्यांनी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला भ्रमणध्वनीवरून खंडणीसाठी धमकावले होते. या घडामोडींनी कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.