जेएनपीटी बंदरातील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उरणमध्ये खासकरून जेएनपीटी वाहतूक पोलीस ठाणे तयार करण्यात आलेले असून जेएनपीटी बंदरातील तिन्ही बंदरांतून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो जड तसेच हलक्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा शुल्क कार्यालयाजवळ सिग्नल बसविण्यात आलेला आहे. यापैकी एका सिग्नलवर शेजारीच टायर पंक्चरसाठी दुकान थाटलेल्या दुकानदाराने ताबा घेतला असून सिग्नलवर टायर व टय़ूब लटकत असून बंदर उपभोक्ता चौकात वाहतूक नियमन करण्यासाठी येणाऱ्या वाहतूक  विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जेएनपीटी, जीटीआय, दुबई पोर्ट या तीन बंदरांकडे जाणाऱ्या जड तसेच प्रवासी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जेएनपीटी सीमा शुल्क भवन तसेच बंदर उपभोक्ता कार्यालयाच्या चौकात सिग्नल यंत्रणा आहे. मागील अनेक दिवसांपासून ही सिग्नल यंत्रणा बंद असल्याने याच चौकात टायरचे दुकान असलेल्या दुकानदाराने त्याचे टायर चक्क सिग्नलला लटकविले आहेत. या संदर्भात मनसेचे उरण तालुका संघटक रूपेश पाटील यांनी तक्रार केली असून वाहतूक विभागाने सिग्नल यंत्रणा सुरू करून कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात जेएनपीटी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल बंद असल्याचे मान्य करून टायर दुकानदारावर कारवाई करून टायर हटविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.