दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रवेशपत्रात या वर्षी प्रचंड चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकली गेल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी ओळखपत्रात चुका राहिल्याचा त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी जानेवारीतच ओळखपत्रांची यादी पाठवली जाते. ती तपासली गेल्यानंतर संबंधित शाळांना दुरुस्त केलेले विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पाठवले जाते. या वर्षी याच पद्धतीने प्रक्रिया पार पडली. मात्र, विद्यार्थ्यांना द्यावयाच्या ओळखपत्रात प्रचंड चुका राहिल्या. संबंधित मुख्याध्यापकांना दुरुस्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु प्रवेशपत्र दुरुस्त करण्यात मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होते आहे.
राज्य परीक्षा मंडळातर्फे या वर्षी प्रवेशपत्राच्या कामात प्रचंड चुका झाल्या आहेत. लातूर जिल्हय़ातील अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात मराठीऐवजी तामिळ, तेलगू अशा विषयांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव यात प्रचंड चुका आहेत. नांदेड जिल्हय़ातील लोहा तालुक्यामधील एका शाळेचे केंद्र थेट लातूर जिल्हय़ात दाखविण्यात आले. त्यामुळे सर्व ओळखपत्रांवर पुन्हा नव्या केंद्राचे नाव लिहिण्याची वेळ आली. अशाच चुका मंडळाने सुरू ठेवल्या, तर परीक्षेनंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रात त्या तशाच राहू शकतात. या चुकांच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी, पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही- मुल्ला
उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षा मंडळाचे लातूर विभागाचे अध्यक्ष एन. एच. मुल्ला यांनी लातूर विभागातील प्रवेशपत्रात अत्यंत कमी चुका आहेत. तांत्रिक कारणामुळे त्या राहिल्या आहेत. चुका कितीही गंभीर असल्या तरी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाणार नाही. संबंधित मुख्याध्यापकांनी त्यांनी ज्या दुरुस्त्या केल्या आहेत, त्या मंडळाकडे पाठवून द्याव्यात, त्यानुसार चुकांची दुरुस्ती केली जाईल व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळताना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले.