विदर्भ आर्थिक विकास परिषद (वेद), दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान तिसरा वाघ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी काही कारणास्तव वाघ उत्सवात खंड पडल्यानंतर यावर्षी पुन्हा तीन दिवस नवीन कार्यक्रमांसह दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाघ उत्सवानिमित्त २० फेब्रुवारीला चौथी ते सातवी आणि सातवी ते नववी अशा दोन शालेय गटांमध्ये वेशभूषा तसेच पडित, कोरडय़ा आणि ताज्या फुलांची पुष्परचना स्पर्धा आयोजित केली आहे. वन्यजीव छायाचित्रण स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते करण्यात येईल व रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांसाठी ते खुले राहील. यात निवडक छायाचित्रांचीच निवड केली जाईल. निकॉन आणि टायगर किंग रिसॉर्टकडून पारितोषिके देण्यात येतील. शालेय विद्यार्थ्यांकरिता दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ‘द जंगल क्विज’, दुपारी १२ ते रात्री नऊ वाजेपर्यंत विविध राज्यातील आदिवासी कलावंतांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, सायंकाळी सहा वाजता आदिवासी नृत्य, फॅशन शो आयोजित केले आहेत. वन्यजीवावरील चित्रपट दुपारी १२ ते दोन या वेळेत आणि वाघ उत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी ‘मुझे भी कुछ कहना है’ व प्रश्नस्पर्धा आयोजित केली आहे.
२१ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता व्याघ्र संवर्धनावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून सांस्कृतिक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राघव चंद्रा मार्गदर्शन करतील. आधुनिक छायाचित्रण कार्यशाळा दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित असून निकॉन स्कूलचे विनय ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांकरिता कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
२२ फेब्रुवारीला ‘व्याघ्र राजधानीत स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर वनखात्याच्या सहकार्याने चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. एनडीटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रम चंद्रा मार्गदर्शन करतील. दुपारी १२.५० ते १.१० वाजेपर्यंत हे चर्चासत्र होईल. कार्यक्रमाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. पत्रकार परिषदेला राहुल उपगन्लावार, विलास काळे, विनिता माथूर उपस्थित होते.