रिक्षाचालकांचे मनमानी धोरण आणि टीएमटी बसेसची अपुरी सेवा यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा भागांतील प्रवासी अक्षरश: हैराण असताना ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील सुमारे ८० बसेस दीर्घ आजारामुळे (लाँग सिक) प्रवाशांना सेवा देण्यास असमर्थ असल्याची जाहीर कबुली परिवहन व्यवस्थापनाने दिली आहे. टीएमटीच्या १०० बसेस दररोज आगारात उभ्या असतात हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. या बसेस आगाराबाहेर आणून प्रवाशांना पुरेशी सेवा देऊ शकतील का, याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, त्यापैकी सुमारे ८० बसेस पुरत्या खंगून गेल्या असून त्यांच्या दुरुस्तीसाठी उपक्रमाकडे पुरेसा निधी नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
महिन्याला सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या टीएमटी व्यवस्थापनाने प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. भाडेवाढीमुळे हा तोटा काही प्रमाणात कमी होऊ शकेल. त्यामुळे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देता येईल, असा परिवहन व्यवस्थापनाचा दावा आहे. मात्र भाडेवाढीनंतर तरी या आजारी बसगाडय़ांची दुरुस्ती होईल का, असा सवाल सध्या महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे. टीएमटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीस सुमारे ३२८ बसेस आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून टीएमटीने मध्यंतरी सीएनजीवर धावणाऱ्या नव्या बसेस खरेदी केल्या. मात्र या बसेसही वरचेवर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, अशी माहिती टीएमटीतील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली. अपुऱ्या बसेसमुळे घोडबंदर तसेच मीरारोड भागात २५ बसेस भाडेतत्त्वावर घेऊन सेवा पुरविण्याची नामुष्की परिवहन उपक्रमावर यापूर्वीच ओढवली आहे. त्यामुळे नादुरुस्त असल्याने आगारात उभ्या असलेल्या १०० बसेस वेगवेगळ्या मार्गावर सुरू करता येतील का, याची चाचपणी मध्यंतरी व्यवस्थापनाने सुरू केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर, लोकमान्यनगर, पवारनगर, घोडबंदर, लोकपुरम अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. वागळे भागातही मोठी नागरी वस्ती आहे. सायंकाळी तसेच रात्री उशिरा रेल्वे स्थानकातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत, असे चित्र आहे. रिक्षाचालकांच्या मनमानी धोरणामुळे ठाणेकर हैराण आहेत. अपुऱ्या बसेसमुळे थांब्यावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा दिसून येतात. अशा परिस्थितीत टीएमटीच्या अधिकाधिक बसेस आगाराबाहेर पडाव्यात यासाठी आयुक्त आर. ए. राजीव यांनी मध्यंतरी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी ३२७ बसेसपैकी जेमतेम १८० बसेस आगाराबाहेर पडत असत. राजीव यांच्या कडक धोरणांमुळे हे प्रमाण सध्या २२० पर्यंत पोहोचले आहे. तरीही ८० बसेस पुरत्या खंगल्याने मोठय़ा दुरुस्तीशिवाय आगाराबाहेर काढता येणारच नाहीत, असे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. ३१ बसेस या दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असतात. मात्र, ८० बसेसच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी लागणार आहे. हा निधी सध्या तरी उपक्रमाकडे नसल्याने या ८० बसेस दीर्घ आजारातून कधी बऱ्या होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.