येथील वर्तकनगर परिसरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने कॅडबरी नाका ते उपवन तलावापर्यंत रस्ता रुंदीकरण तसेच याच मार्गावर वर्तकनगर, शिवाईनगर परिसरात दोन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते अडीच वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा इरादा आहे. या कामाची निविदा काढण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. रस्ता रुंदीकरण आणि दोन उड्डाणपूल यामुळे वर्तकनगर भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करणात येणाऱ्या मागणीला आयुक्त असीम गुप्ता यांनी अखेर या हिरवा कंदील दाखविला आहे.
ठाणे शहरात वर्तकनगर-शिवाईनगर मार्गे वसंतविहार येथून घोडबंदर मार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. घोडबंदर मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती. परिणामी, कापूरबावडी जंक्शन आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागत होते. ही वाहतूक कोंडी नित्याची झाल्यामुळे अनेक चालकांनी कॅडबरी नाका येथून वर्तकनगर-शिवाईनगरमार्गे घोडबंदरच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. मात्र कॅडबरीनाका-वर्तकनगर-शिवाईनगर हा रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती. गेल्या काही वर्षांपासून या भागात मोठमोठय़ा शैक्षणिक संस्था तसेच गृहसंकुलांचे जाळे उभे राहिले आहे. लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, म्हाडा यांसारख्या जुन्या वसाहती याच भागात येतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची संख्या तिपटीने वाढली आहे. त्यामुळे एरवी सुटसुटीत वाटणारा कॅडबरी जंक्शन ते शिवाईनगर हा प्रवास नकोसा वाटू लागला होता. हे लक्षात घेऊन या भागात रस्त्याचे रुंदीकरण तसेच उड्डाणपूल उभारण्याचा ठराव विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी मांडला होता. हा ठराव मंजूर होऊनही गेल्या काही वर्षांत या दृष्टीने हालचाल झाली नव्हती.
अखेर महापालिकेने या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तांत्रिक सल्लागारांमार्फत सविस्तर अभ्यास सुरू करून या मार्गावरील वाहनांची प्रतिदिनी संख्या आणि नित्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा अभ्यास करून सल्लागारांनी महापालिकेस अहवाल दिला होता. तसेच रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपुलांचा पर्याय सुचविला होता. या अहवालानुसार महापालिकेने कॅडबरी नाका ते उपवन तलावापर्यंत रस्त्याचे ४० मीटर रुंदीकरण करण्याचा तसेच वर्तकनगर, शिवाईनगर या दोन्ही मुख्य चौक परिसरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी महापालिकेस सुमारे १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामासंबंधी तांत्रिक सल्लागारांचा अहवाल प्राप्त झाला असून या कामास महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार या कामाची निविदा काढण्याची तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे नगर अभियंता के. डी. लाला यांनी वृत्तान्तला दिली.