ठाणे महापालिकेने फेसबुक हजेरीपाठोपाठ आता अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेट ओळखपत्र देण्याची योजना आखली असून केंद्र सरकारने आखलेल्या ‘आधार’ कार्डाच्या धर्तीवर या ओळखपत्रांमध्ये प्रत्येकासाठी स्वतंत्र युनिक सुरक्षा कोडचा वापर करण्यात आला आहे. मोबाइलमध्ये विकसित केलेले तंत्रज्ञान तसेच वेब कॅमेऱ्याच्या आधारे हा युनिक सुरक्षा कोड स्कॅन करून ओळखपत्र खरे आहे का, याची चाचपणी करणे महापालिका प्रशासनास यामुळे अधिक सोपे होणार आहे. विशेष म्हणजे, एखाद्या नागरिकास संबंधित कर्मचाऱ्यांची ओळख खरी आहे किंवा नाही हे तपासायचे असेल तर त्यालाही याद्वारे ओळखपत्रातील सत्यता तपासण्याची व्यवस्था या नव्या यंत्रणेत आहे.
बनावट तसेच गाहाळ झालेल्या ओळखपत्रद्वारे गैरवापर होऊ नये, यासाठी महापालिकेने अशा स्वरूपाची ओळखपत्रे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका राज्यात कॉर्पोरेट ओळखपत्राचा वापर करणारी पहिली महापालिका ठरणार आहे.
कॉर्पोरट ओळखपत्र तयार करण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले असून या कंपनीने युनिक सुरक्षा कोडचा वापर करून नवी ओळखपत्रे तयार केली आहेत.
ओळखपत्र कसे आहे..
महापालिकेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये प्रत्येकासाठी स्वतंत्र युनिक कोडचा वापर करण्यात आला असून या सुरक्षा युनिक कोडद्वारे ओळखपत्र खरे आहे की नाही, याची खात्री करता येऊ शकते. मोबाइलमध्ये विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान तसेच वेब कॅमेऱ्याच्या आधारे ओळखपत्राचा युनिक सुरक्षा कोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलवर ओळखपत्रधारकाची सविस्तर माहिती दिसून येते. त्यामध्ये नाव, फोटो, पदनाम, रक्तगट, कामगार क्रमांक आदींचा समावेश असतो, अशी माहिती ओळखपत्र तयार करणाऱ्या पेपर टेक्नॉलॉजीस कंपनीचे मुख्याधिकारी निरंजन गोसावी यांनी दिली.
ओळखपत्र कोणीही तपासू शकतो..
मोबाइलमधील तंत्रज्ञानाच्या आधारे महापालिका अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकही कर्मचाऱ्याचे ओळखपत्र खरे आहे का, याची चाचपणी करू शकतो. एखाद्या सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या कर्मचाऱ्याची ओळख संबंधित नागरिकाला ओळखपत्राद्वारे होत असते. मात्र ही ओळख खरी आहे किंवा नाही हे तपासणे नागरिकांना शक्य होत नाही. मध्यंतरी आपण महापालिकेचे कर्मचारी आहोत असे सांगत वर्तकनगर परिसरातील पोलीस वसाहतीमधील घरांच्या बांधकामाचे सर्वेक्षण करावयास काही व्यक्ती गेल्या होत्या. हे सर्वेक्षण कर्मचारी महापालिकेचे नव्हेत तर याच भागातील एका राजकीय पुढाऱ्याचे ‘हस्तक’ असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तींकडे महापालिकेचे बनावट ओळखपत्र असल्याच्या तक्रारी येथील काही रहिवाशांनी केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मोबाइलमधील हे नवे तंत्रज्ञान रहिवाशांसाठीही उपयुक्त ठरू शकेल, असा दावा महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी केला. ही यंत्रणा सुरक्षा यंत्रणेपुरतीच मर्यादित न ठेवता सर्वासाठी खुली करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.