ठाणे महापालिकेचा कोटय़वधी रुपयांचा जकात कर थकविणाऱ्या शहरातील मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी सोमवारच्या सभेत केली असून ऐन होळीच्या दिवशी मद्य विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत असतो, नेमकी हीच संधी साधून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या सूचनाही सदस्यांनी केल्या. दरम्यान, महापालिका प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्यास जकात कर थकविणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर ऐन होळी उत्सवाच्या दिवशी संक्रांत ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे शहरात मद्य विक्रीची सुमारे ३८ दुकाने असून यापैकी काही मद्य विक्रेत्यांनी महापालिकेचा जकात कर थकविला आहे. २०१० या वर्षांचा हा जकात कर असून त्याची अद्यापही वसुली करण्यात आलेली नाही, असा मुद्दा उपस्थित करीत सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. तसेच मद्य विक्रेत्यांच्या दंडाची रक्कम सुमारे ४५ टक्क्य़ांनी कमी करण्यात आली असून त्यांना सूट देण्यामागचा हेतू काय, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. कर थकविल्यास सर्वसामान्य नागरिकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येते. मात्र, जकात कर थकविणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, शहरातील मद्य विक्रेत्यांकडे मद्याची जकात भरल्यासंबंधीचा तपशील मागविण्यात आला होता. मात्र, काही मद्य विक्रेत्यांनी अद्यापही तपशील दिलेला नाही. त्यामुळे राज्य  उत्पादन शुल्क विभागाकडून माहिती घेऊन त्यानुसार त्यांना दंडाच्या नोटिसा पाठविल्या. तसेच आतापर्यंत सुमारे साडेसहा कोटी रुपये दंडाची वसुलीही करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि मद्य विक्रेत्यांना वेगवेगळा न्याय देण्यात येत असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्वसामान्य नागरिकांकडून ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कराची वसुली करण्यात येत आहे, त्याच पाश्र्वभूमीवर मद्य विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी या वेळी केली. तसेच ऐन होळी उत्सवाच्या काळात मद्य विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत असतो. त्यामुळे याच दिवशी त्यांच्या दुकानांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. त्यानुसार, स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी महापालिका प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले.