वाढत्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत ऐतिहासीक खुणा हळूहळू एकेक करून नाहीशा होत असलेल्या आधुनिक ठाणे शहराने आपले हे प्राचीन रूप पुढील पिढय़ांच्या माहितीसाठी प्रतिरूप स्वरूपात जपण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेने त्यासाठी चितळसर-मानपाडा विभागात एक भला भूखंड जपून ठेवला असून त्याठिकाणी प्राचीन शहराचे हे प्रतिरूप उभारले जाणार आहे. ठाणे शहर तसेच जिल्ह्य़ातील प्राचीन ऐतिहासिक खुणा जतन करण्यासाठी एक समृद्ध वस्तुसंग्रहालयाची आवश्यकता असून प्राचीन शहराचे हे प्रारूप काही प्रमाणात का होईना ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास त्यामुळे वाटू लागला आहे.
सात बेटांच्या मुंबईलगत असलेले ठाणे हे सातवाहनांच्या काळापासून प्रचलित एक समृद्ध बंदर आहे. आता अनधिकृत आणि बेकायदा बांधकामांमुळे बदनाम झालेले हे शहर शिलाहारांची राजधानी होती. त्यांनी या परिसरात स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेली १२ शिवमंदिरे बांधली. पुढील काळात पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रजांनी ठाणे शहरावर राज्य केले. त्या त्या राजवटीच्या खुणा अजूनही या शहरात सापडतात. अशा रीतीने ठिकठिकाणी विखुरलेल्या इतिहासखुणा जपण्यासाठीही प्राचीन शहराचे हे प्रारूप उपयोगी ठरणार आहे.
नियोजन फसले.. इतिहास जपण्याचा प्रयत्न   
झपाटय़ाने विकसित होणाऱ्या ठाणे शहराला प्राचीन असा इतिहास लाभला आहे. सांस्कृतिक शहर, तलावांचे नगर अशा बिरुदावल्या मोठय़ा मानाने मिरविणाऱ्या या शहराचे गेल्या काही दशकांमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणावर विद्रूपीकरण झाले. ठाण्याच्या पश्चिमेकडे झपाटय़ाने विकसित होणाऱ्या घोडबंदर परिसरात नव्यानेच राहावयास आलेल्या रहिवाशांना या शहराच्या प्राचीन इतिहासाविषयी फारशी कल्पना नाही. त्यामुळेच इतिहासाच्या या जुन्या, ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठी महापालिकेने चितळसर-मानपाडा भागात जुन्या ठाणे शहराची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चितळसर-मानपाडा भागातील एका मोठय़ा भूखंडावर ठाण्याचे जुने बंदर, रेल्वे स्थानक, गडकरी नाटय़गृह, ठाणे कारागृह अशा वास्तूंच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. पहिली रेल्वे धावली तेव्हाचे ठाणे स्थानक आणि सॅटीस उभारल्यानंतर उभे राहिलेले नवे स्थानक अशा दोन्हींच्या प्रतिकृती याठिकाणी उभारल्या जाणार आहेत. ठाणे शहरातील गणपती विसर्जनासाठी राबवली गेलेली कृत्रिम तलावांची कल्पना, कोपिनेश्वर मंदिर, एम. एच. हायस्कूल, मासुंदा तलाव, जुने ठाणे आरमार अशांच्या फायबर प्रतिकृती याठिकाणी असणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ‘थीम पार्क’च्या धर्तीवर हा प्रकल्प उभा केला जाणार आहे.
५० रुपयांचे तिकीट दर
‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या धर्तीवर हा प्रकल्प उभा केला जाणार असून या उद्यानात प्रवेश करण्यासाठी ५० रुपयांचे प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या थीम पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी २५ रुपये आकारले जाणार आहे. प्रत्येक वर्षी या तिकीट दरात १० टक्के याप्रमाणे वाढ करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली. मिनी इंडिया, मिनी महाराष्ट्र, मिनी शिवशाही अशा प्रकल्पांच्या धर्तीवर या प्रकल्पांची संकल्पना ठरविण्यात आली असून ठाणे शहराच्या प्रतिकृतीच्या सोबतीला वरील प्रकल्पांच्या लहानग्या प्रतिकृतींचाही या उद्यानात समावेश असणार आहे.