ठाण्यातील बडय़ा विकासकांच्या प्रकल्पांना वेग यावा यासाठी गेल्या काही वर्षांत शेकडो वृक्षांच्या कत्तलीस परवानगी देणाऱ्या ठाणे महापालिकेने यंदाच्या पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधत ठाणे शहर ‘हरित’ करण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीच अस्तित्वात नव्हती, त्यामुळे वृक्षतोडीच्या अनेक प्रस्तावांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने मंजुरी दिल्याचे चित्र सातत्याने पुढे येत होते. घोडबंदर मार्गावरील बडय़ा विकासकांच्या प्रकल्पांमध्ये अडथळा ठरत असलेल्या शेकडो वृक्षांच्या कत्तलीस एकमुखाने पाठिंबा दिल्यानंतर पुढील दोन महिन्यांत ठाणे शहरात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये २१ हजार नव्या वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रयत्नाला ठाण्यातील पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत असले तरी ‘बुंद से गयी वो हौद से नही आती,’ अशा प्रतिक्रियाही या निमित्ताने महापालिका वर्तुळात उमटताना दिसत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात गुरुवारी (५जून) जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जांभूळ, तामण, बहावा, सप्तपर्णी, बकुळ, महोगनी, बदाम, कदंब, कडुनिंब, कांचन, रिठा, सोनमोहर आदी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महापालिका यापूर्वी छोटय़ा रोपांची लागवड करीत होती. मात्र, छोटी रोपटी जगण्याचे प्रमाण कमी असते, असा महापालिकेचा आजवरचा अनुभव आहे. याच पाश्र्वभूमीवर वृक्ष लागवडीनंतर त्यांच्या जगण्याचे प्रमाण वाढावे यासाठी महापालिकेने किमान दोन वर्षे वयाचे आणि सात फूट उंचीच्या वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका क्षेत्रातील नौपाडा, उथळसर आणि वर्तकनगर प्रभागात सात हजार वृक्ष, वागळे, रायलादेवी आणि माजिवडा-मानपाडा प्रभागात आठ हजार वृक्ष तसेच कोपरी, कळवा आणि मुंब्रा प्रभागात सहा हजार वृक्ष याप्रमाणे वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील उद्याने, मोकळ्या जागा, डोंगर भाग, वन विभागाच्या जागा तसेच बगीचा, मोठी उद्याने, मैदाने यासाठी आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
वृक्षांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा
गेल्या तीन वर्षांत रस्त्यांच्या दुर्तफा सुमारे नऊ हजार वृक्ष तसेच घोलाईनगर डोंगर भागात पाच हजार वृक्ष, मुंब्रा-शीळ  येथील डोंगर भागात २६ हजार वृक्ष, मोकळ्या जागा व आरक्षित भूखंडांवर तीन हजार वृक्ष, असे एकूण ४३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत कत्तल झालेल्या वृक्षांची संख्याही मोठी असल्यामुळे ठाणे महापालिका टीकेचे लक्ष्य ठरू लागली आहे. माजी आयुक्त आर. ए. राजीव यांनी ठाण्यातील पदपथांवर हिरवा गालिचा अंथरण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजीव यांच्यानंतर महापालिका प्रशासनाने वृक्षतोडीचे अनेक प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पाठविल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यातील घोडबंदर पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुलांची उभारणी होत असून हा सगळा पट्टा संजय गांधी उद्यानाचा परिसर म्हणून ओळखला जातो.
या जंगलांच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली असून असे करताना काही मोठे वृक्ष अडथळा ठरत असल्याचे दिसून येते. अशा वृक्षांच्या कत्तलींची परवानगी यापूर्वी दिली गेल्याची पर्यावरण प्रेमींची तक्रार आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये आपली वर्णी लागावी, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचा एक मोठा गट यामुळेच प्रयत्नशील होता, असेही सांगितले जाते.