सुमारे दोन हजारांहून अधिक कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा ताफा बाळगूनही ठाणेकरांना प्रभावी बससेवा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या परिवहन उपक्रमाने उशिरा का होईना खासगीकरणाचा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला असून येत्या वर्षभरात १०० बसेस भाडेतत्त्वावर घेऊन ठाणेकर प्रवाशांची ‘दुधाची तहान ताकावर’ भागविण्याचा प्रयत्न ‘टीएमटी’मार्फत केला जाणार आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून येत्या वर्षभरात २३० नव्या बसेस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस चालविण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्गही कंत्राटी पद्धतीने नेमायचा, असा प्रस्ताव आहे. तसेच या सर्व बसेस खासगी ठेकेदारामार्फत चालवायच्या, शिवाय १०० बसेस भाडेतत्त्वावर सुरू करायचा प्रस्ताव असून असे झाल्यास ‘टीएमटी’चे खासगीकरण पक्के मानले जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रस्तावांचा उल्लेख करून खासगीकरणाच्या चर्चेला मूर्त स्वरूप देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
भाडय़ाच्या बसेस..कंत्राटी कामगार
‘टीएमटी’चे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भाडेतत्त्वावर बसेस चालविण्याचा प्रस्ताव लवकरच परिवहन समितीपुढे मांडण्याचे सुतोवाच केले. सद्यस्थितीत ‘टीएमटी’मार्फत २५ बसेस भाडेतत्त्वावर चालविण्यात येतात. त्यापैकी जेमतेम १३ ते १५ बसेस आगाराबाहेर पडतात. त्यामुळे आणखी १०० बसेस भाडय़ाने घेऊन ठाणे, कळवा, मुंब्रा आणि विशेषत: घोडबंदर मार्गावरील वेगवेगळ्या भागात सुरू करायचा प्रस्ताव टेकाळे यांनी मांडला. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून २३० नव्या बसेस खरेदी करण्यात येणार असून या सर्व खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत. या बसेस चालविण्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार असून वाहक आणि चालक कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे अस्थापनेवरील खर्च कमी होईल तसेच प्रभावी सेवा मिळेल, असा व्यवस्थापनाचा दावा आहे.
भूखंड विकसित करणार
डिझेल तसेच इंधनावर होणारा खर्च लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखडय़ात परिवहन सेवेकरिता आरक्षित असलेले भूखंड यावर्षी पदरात पाडून घेण्याचा संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे. टीएमटीसाठी आरक्षित असलेले १९ भूखंड यावेळी ताब्यात घेण्यात येणार असून त्यापैकी काही विकसित करणे तसेच हस्तांतरीत करून पैसे उभे करण्यात येणार आहेत. या माध्यमातून इंधनावर होणारा खर्च कमी करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
’ महिलांसाठी १० टक्के राखीव बसेस
सद्यस्थितीत महिला प्रवाशांसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळेत शिवाईनगर, पवारनगर, वृंदावन या मार्गावर महिला विशेष बस फेरी सुरू करण्यात आली आहे. तसेच ३३ टक्के आसने प्रत्येक बसमध्ये महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. महिला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता येत्या वर्षांत एकूण बसेसच्या १० टक्के बसेस महिलांसाठी २४ तास राखीव ठेवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला जात आहे.
भाडेउत्पन्न वाढविणार..अनुदानही हवे
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवासी भाडय़ापोटी ७४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. याशिवाय भाडेतत्त्वावरील बसेस आणि वातानुकूलित बसेसमार्फत सुमारे दहा कोटी रुपयांचे ऊत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. येत्या वर्षांत २३० नव्या बसेस दाखल झाल्यास त्यामार्फत सुमारे १५ कोटी असे तिकीट विक्रीच्या माध्यमातून एकूण १०० कोटी रुपयांचे ऊत्पन्न गृहीत धरण्यात आले आहेत. ठाणे महापालिका ‘टीएमटी’ला ३० कोटी रुपयांचे अनुदान देते. मात्र वेतनासाठी रक्कम कमी पडू लागल्याने आणखी साडेपाच कोटी रुपयांचे अनुदान मिळावे, अशी विनंती महापालिकेस करण्यात आली आहे.