ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम निधीअंतर्गत दहा व्होल्वो बस दाखल झाल्या असून या बसगाडय़ा ठाणे-अंधेरी आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) या दोन मार्गावर सुरू करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. परिवहन सेवेच्या या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर परिसरातून अंधेरी आणि बीकेसीला कामानिमित्त जाणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना आता व्होल्वो बसची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   
ठाणे परिवहन सेवेत सध्या ३१३ बसगाडय़ा असून त्यापैकी सुमारे दोनशे तर भाडेतत्त्वावरील २५ पैकी १३ ते १५ बसगाडय़ा दररोज रस्त्यावर धावतात. उर्वरित बसगाडय़ा नादुरुस्त असल्याने आगारात धूळखात पडल्या आहेत.  ठाणे शहरातील २०१३ ची लोकसंख्या लक्षात घेता नवीन ४०० बस गाडय़ांची आवश्यकता असून त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, केंद्र शासनाने जेएनएनयूआरएम निधीअंतर्गत २३० बसगाडय़ा खरेदी करण्यास मान्यता दिली होती. त्यामध्ये १४० साध्या बस, ५० मिडी बस, ४० वातानुकूलित बसचा समावेश होता. या बसगाडय़ांच्या खरेदीसाठी १३० कोटी  ५० लाख रुपये तर पायाभूत सुविधांसाठी १० कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ४० पैकी १० वातानुकूलित बसगाडय़ा ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या असून या बसगाडय़ा लवकरच ठाणे-मुंबई शहरात धावणार आहेत.
नव्या बसचे मार्ग
दहापैकी चार बसगाडय़ा घोडबंदर ते बीकेसी आणि चार बसगाडय़ा कासारवडवली ते अंधेरी या मार्गावर धावणार आहेत. तर उर्वरित दोन बसगाडय़ा ठाणे तसेच मीरा-भाइंदर शहरात धावणार आहेत. घोडबंदर हिरानंदानी-पुर्व द्रुतगती महामार्ग-घाटकोपर-बीकेसी, असा घोडबंदर ते बीकेसी या मार्गावरील बसचा मार्ग असणार आहे. तसेच कासारवडवली-कापुरबावडी-तीन हात नाका- मॉडेला चेकनाका-पवई-सीप्झ-चकाला-अंधेरी, असा कासारवडवली ते अंधेरी मार्गावर धावणाऱ्या बसचा मार्ग असणार आहे. या दोन्ही मार्गावर सकाळी आठ आणि सांयकाळी आठ अशा एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. या मार्गावर प्रथमच बससेवा सुरू करण्यात येणार असल्याने या सेवेस प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याचे मूल्यमापन परिवहन प्रशासन करणार असून त्यानंतरच ही सेवा कायमस्वरूपी करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे. या वृत्तास परिवहन सेवेचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दुजोरा दिला आहे.