News Flash

महापूर टाळण्यासाठी यंत्रणांकडून दक्षतेची खास गरज

गंगापूर धरणातून पाणी सोडताना २००८ मध्ये शहरात निर्माण झालेली महापुरासारखी स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पाटबंधारे विभागाने अचानक पाणी सोडण्याऐवजी पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस, धरणात

| August 2, 2014 01:15 am

गंगापूर धरणातून पाणी सोडताना २००८ मध्ये शहरात निर्माण झालेली महापुरासारखी स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पाटबंधारे विभागाने अचानक पाणी सोडण्याऐवजी पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस, धरणात येणारे पाणी यांचा काटेकोरपणे अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. पाटबंधारे विभाग धरण पूर्ण भरून घेण्याचा अट्टहास धरते. गतवेळी या कार्यशैलीमुळे शहराला महापुराने तडाखा दिला होता याची आठवण करून देत त्यांनी यंदा पुन्हा तशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सूचित केले. तसेच नदीपात्रात ठिकठिकाणी अडकलेल्या पानवेली त्वरित हटविणे, संपर्कहीन झालेल्या गावांशी संपर्क प्रस्थापित करणे, जिल्ह्य़ात धोकादायक ठिकाणी असलेल्या गाव व पाडय़ांना सतर्क करणे आदी सूचनाही करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्य़ातील माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी विलास पाटील, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह पाटबंधारे विभाग, महापालिका व इतर शासकीय यंत्रणांचे प्रमुख, लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्य़ात कोणत्या भागात दरडी कोसळू शकतात, याची माहिती संकलित करण्यात आली आहे. डोंगरदऱ्यांमध्ये अनेक छोटी गावे व पाडे वसलेले असून त्यांचे सूक्ष्म पातळीवर सर्वेक्षण केले जाणार आहे. या काळात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखला जाणे महत्त्वाचे असून आधुनिक तंत्राद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये, आपत्ती व्यवस्थापन कक्षात चोवीस तास कर्मचारी तैनात राहतील याची दक्षता घ्यावी, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
आठ दिवसांत जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे चित्र पालटले. धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली. धरणातून पाणी सोडताना खालील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. २००८ मध्ये गंगापूर धरणातून अचानक मोठय़ा प्रमाणात पाणी सोडले गेले. त्याचा फटका सराफ बाजार व नदीकाठालगतचा परिसर चिखलमय होण्यात झाला. धरणातून पाणी सोडताना अभ्यास करून नियोजन करावे, जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर लक्ष द्यावे, असेही सूचित करण्यात आले. सापुतारा धरणामुळे जिल्ह्य़ातील गावांना निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणा त्या भागातील यंत्रणेशी समन्वय साधून तोडगा काढत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरडी कोसळण्याचा धोका असलेली ठिकाणे
नाशिक जिल्ह्य़ात धोकादायक भागांत असणारी गावे व पाडय़ांचे सूक्ष्म पातळीवर सर्वेक्षण सुरू झाले असून कोणकोणत्या भागांत दरड कोसळण्याची अथवा भूस्खलनाची शक्यता आहे, याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली. असे प्रकार घडण्याचा सर्वाधिक धोका कळवण तालुक्यात असून पेठ, दिंडोरी व नाशिक शहरातील काझीगडीचाही भाग त्यात समाविष्ट आहे. धोकादायक भागांत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्क करण्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीत त्यांना स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कळवण तालुक्यातील दळवट भागात भूगर्भात काही वर्षांपासून घडामोडी घडत आहेत. या तालुक्यात दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. या तालुक्यात मंगालिंदर, तताणीपाडा, जामले, कोसुर्दे, बाकुर्डे, केरभेल, दिसगाव, तिराळ, गांडूळमोकपाडा, अमदर, दिगामे, खर्डेदीगर, उंबरगव्हाण, चोलीचा माल, हनुमंत मळा, महाल, पायरपाडा, कथरेदिगर, बिर्डीवाट, डेरेगाव, वणी, मोहदरी, नांदूर, सप्तशृंग गड, मेहेदर, मुकणेवणी, वडाळे, मरकड प्रिंपी, काटलगाव. पेठ तालुक्यात सादडपाडा, बिलकस, बेहाडपाडा, कलामपाडा, गोंडसवाडा, डेरापाडा, कासारविहीर, कादवपाडा, जबाले. दिंडोरी तालुक्यात रडतोंडी, अवंतवाडी, चंडिकापूर, सूर्यगड, पिंपरज, तर नाशिक शहरातील गाझीगढीचाही धोकादायक ठिकाणांमध्ये समावेश आहे.

‘सॅटेलाइट फोन’ आणण्याचे प्रयत्न
दुर्गम भागात आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास संपर्क यंत्रणेअभावी अडचणींना तोंड द्यावे लागू नये म्हणून दहा ‘सॅटेलाइट फोन’ आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उपग्रहाधारित दूरध्वनीची मागणी आधीच जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. हे फोन लवकर मिळाल्यास आपत्तीवेळी त्याचा वापर करता येईल असे नियोजन आहे. ज्या भागात भ्रमणध्वनी व इतर संपर्क व्यवस्था नसेल, त्या ठिकाणी अशी व्यवस्था कार्यान्वित करण्यासंबंधी भ्रमणध्वनी कंपन्यांना सूचना कराव्यात, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गंगापूर धरणाचे दरवाजे उघडले
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा सुमारे ८० टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याने शुक्रवारी सकाळी या धरणाचे दरवाजे प्रथमच उघडण्यात आले. सध्या धरणातून १०४१ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर व धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस झाल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. साधारणत: २० हजार क्यूसेक्स पाणी सोडल्यानंतर गोदावरीला पूर येतो. पावसाचा जोर ओसरल्याने दारणा व नांदुरमध्यमेश्वर धरणांचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी दारणा धरणातून ८०४९, तर नांदुरमध्यमेश्वरमधून ९६४७ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:15 am

Web Title: to avoid flood condition in nashik special precautions need to be taken
टॅग : Nashik
Next Stories
1 खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची कोटीच्या कोटी उड्डाणे
2 मैत्र दिनाचा उत्साह तर, रक्षाबंधनची भावनिकता
3 विद्युत पारेषणचे सुरक्षा रक्षक वेतनवाढीपासून वंचित
Just Now!
X