सहकार चळवळ ही महाराष्ट्राची ताकद आहे व राज्याची ती जगासाठीची ओळखही आहे, या चळवळीला काळीमा लावण्याचे काम कोणी करु नये तसेच या चळवळीबद्दल नकारात्मक मानसिकताही बदलण्याची आवश्यकता आहे. भविष्यात या चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी खाजगी संस्थांशी स्पर्धा, प्रशिक्षण, व्यावसायीक दृष्टीकोन, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी व सवंग लोकप्रियतेचे निर्णय नको या पंचसुत्रीचा वापर करायला हवा, असे अवाहन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
मराठा सेवा संघप्रणित सहकारमहर्षी संकरराव मोहिते पाटील सहकार परिषदेच्या वतीने नगरमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरिय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी सहकारमंत्री पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘समाजरत्न’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पुर्वी सकाळी आ. डॉ. सुधीर तांबे व विश्वास नागरी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकुर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
सहकाराच्या १०० वर्षांत संख्यात्मक वाढ झाली, आता गुणात्मक वाढ करावी लागेल, असे स्पष्ट करुन पाटील म्हणाले की, सहकारी बँकांच्या ठेवीत गेल्या वर्षी २५ हजार कोटी रु.ची वाढ झाली, याचाच अर्थ लोकांचा सहकारावर विश्वास आहे. ही चळवळ वाढावी, टिकावी यासाठी निस्वार्थी काम करण्याची वृत्ती हवी.
महसुलमंत्री थोरात म्हणाले की, पुढिल ५० वर्षांत सहकार कोणत्या दिशेने न्यायचा याचा विचार आताच व्हायला हवा, मराठवाडा व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, हा भागास मागास म्हणुन शेतकऱ्यांना दोष देता येणार नाही, कारण तेथे परिवर्तन घडवणारी व्यवस्थाच नाही, त्यासाठी सहकाराला चालना तेथे द्यावी लागणार आहे.
सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी साहित्य, चित्रपट, मालिका यातुन सहकाराला, साखर कारखानदारीला तसेच मिडियाच्या कुजबुज पद्धतीने कृषी, सहकार, व सिंचन खात्यातील मंत्र्यांना जाणीवपुर्वक बदनाम केले, त्यामुळे सहकारातील मराठा समाजाचे कंबरडे मोडले गेले, असा आरोप करताना मंत्र्यांनी सहकारातील टोळ्यांचे राजकारण थांबवावे, असे अवाहन केले. स्वागताध्यक्ष शरद जरे यांनी प्रास्ताविक केले. सहकारात उत्कृष्ट काम करणारे अरविंद गावंडे, अंकुश नलावडे, प्रा. मेधा काळे, अर्जुन बोरुडे, सुधीर पवार, प्रकाश जाधव, श्रीकृष्ण वाडेकर, छाया महल्ले, शिवाजीराव पाटील, सबाजीराव गायकवाड व कोकण काजु प्रकल्प संस्था यांचा गौरव करण्यात आला.