पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे, असे मत नाशिक महसूल विभागाच्या सहआयुक्त सोनाली पोंक्षे यांनी व्यक्त केले. येथील एसएमआरके महिला
महाविद्यालयातील वाणिज्य सप्ताहाच्या समारोपात त्या बोलत होत्या. पर्यावरणविषयक जागरूकता या विषयावर हा सप्ताह आधारीत होता.
जीवनात यश मिळविण्यासाठी चांगली स्वप्ने, जिद्द, चिकाटी, संयम या गुणांची नितांत गरज असल्याचेही पोंक्षे यांनी नमूद केले. फक्त स्वप्न न पाहता स्वप्नपूर्तीच्या दृष्टिने त्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आपली कारकीर्द कशी होईल, याकडे लक्ष द्या. आईवडिलांसाठी आपण कोणी तरी होणे आवश्यक आहे. मी आज जी कोणी आहे ती आईवडिलांमुळेच. दहावीत असतानाच मी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाची पूर्ती करण्यात यश आल्याचा अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय सेवा ही एक आव्हान आहे. तरूणपणात तुम्ही या सेवेत मोठय़ा पदापर्यंत पोहोचू शकता. स्वत:ला ओळखा. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण सर्व काही मिळवू शकतो, असा विश्वासही पोंक्षे यांनी विद्यार्थिनींना दिला.
यावेळी धनश्री हरदास यांनी ‘हरितकुंभ’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी पर्यावरणाचा समतोल साधण्याचा सल्लाही दिला. प्राचार्या दीप्ती देशपांडे यांनी विद्यार्थिनींना पर्यावरणाविषयी जागरूक राहण्याचा सल्ला दिला. वाणिज्य सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्यांची नांवेही त्यांनी जाहीर केली. निबंध स्पर्धेत निगिषा टीजी, पॉवरपॉइंट प्रेझेंटेनशमध्ये मिली छेडा, भित्तीपत्रक स्पर्धेत सायली गवळी, प्रतिकृती निर्मिती स्पर्धेत किरण उमराणी गट, घोषवाक्य स्पर्धेत गौरी जाधव यांनी यश मिळविले. सर्वोत्कृष्ठ विद्यार्थिनी म्हणून पूजा जाधव आणि उत्कृष्ठ विद्यार्थिनी पूजा अवसरकर यांची निवड झाली. प्रास्ताविक सुवर्णा कदम यांनी केले. पाहुण्याचां परिचय प्रा. जयंत भातंबरेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन मिली छेडा, रेणुका वालेचा, मेघना चौबे यांनी केले.