रस्त्यावरील वाहनांची गर्दी व त्यामुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय योजून झाले आहे. त्यात आता वाहने मोजणाऱ्या यंत्रांची भर पडली आहे. वाहने मोजून शास्त्रोक्त पद्धतीने वाहनकोंडीवर मात करता येईल, असा दावा करून महानगरपालिका प्रशासन दोन यंत्र खरेदी करत आहे. सुरुवातीला हाजीअली जंक्शनवर ही यंत्रे लावण्यात येणार आहेत.
शहरातील रस्त्यांची लांबी, रुंदी कमाल मर्यादेपर्यंत वाढवल्यावरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. एखाद्या रस्त्यावर दिवसाच्या कोणत्या वेळेत किती वाहने जातात, त्यातील दुचाकी-चारचाकी, हलकी-अवजड वाहने कोणती, त्यांचा वेग या सगळ्याची माहिती मिळवण्यासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. या माहितीवरून रस्त्यांवरील वाहनांचा आवाका लक्षात येऊन वाहतूक यंत्रणेचे व्यवस्थापन करणे सोयीचे जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे. शहराच्या एखाद्या विशिष्ट रस्त्यावर वाहतूक कोंडी होते तेव्हा आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहने वळवून ती कमी केली जाऊ शकते. सुरुवातीला हाजीअजी जंक्शनवर ही वाहनमोजणी होणार असली तरी नंतर शहरात इतर ठिकाणीही मोजणी करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
सीएमएस ट्रॅफिक सिस्टिम ही खाजगी संस्था वाहनांची गणना करणार आहे. या कामासाठी ऑस्ट्रेलियन कंपनीची प्रत्येकी २१ लाख रुपये किंमतीची दोन यंत्रे घेण्यात येणार आहेत. यंत्रांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल. यंत्राला एक ट्रान्समीटर व एक रिसीव्हर असून त्यात होणाऱ्या नोंदी कोणत्याही वेळेला पाहता येऊ शकतात. मुंबई वाहतूक पोलिसांनाही या माहितीचा उपयोग होऊ शकेल, असे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन म्हणाले.