टाकाऊ अन्नापासून खतनिर्मिती करणाऱ्या २० लाखाच्या ‘इकोमॅन’ लघुसयंत्राचा घोटाळा शिवसेनेने उघड केल्यानंतर त्या ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून शिवसैनिकांनी मंगळवारी महापालिकेत प्रचंड गोंधळ घातला. सहआयुक्त अमृतराव सावंत व पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना घेराव घातला. जवळपास दीड तास चाललेल्या या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली व पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.
शहरातील कचरा विघटनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने गृहप्रकल्पांना प्रायोगिक तत्त्वावर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी दोन लघुसयंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन महापौर योगेश बहल व तत्कालीन वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी लेखी शिफारस केली होती. त्या शिफारशींचा आधार घेत २० लाख रूपये खर्चून दोन यंत्रे घेतली. पहिले यंत्र बहल यांच्या प्रभागात सुखवानी कॅम्पसमध्ये तर दुसरे पक्षनेत्या मंगला कदम यांच्या साईमंगल सोसायटीत बसवण्यात आले. मात्र, या यंत्रांचा थांगपत्ता लागत नसल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी माहिती अधिकारात ते उघडही केले. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर २४ डिसेंबपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संजय कुलकर्णी यांना दिले. तथापि, ते यंत्र पुरवणाऱ्या ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसताच शिवसेनेने मंगळवारी मुख्यालयात आंदोलन केले.
शहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली कुमार जाधव, सारंग कामतेकर, प्रकाश बाबर, रवींद्र खिलारे, सीमा सावळे, आशा शेंडगे, रोमी संधू, वैशाली मराठे आदींनी मुख्यालयात गोंधळ घातला. सावंत यांच्या कक्षात जाऊन त्यांना घेराव घातला. ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगत सावंतांनी कुलकर्णी यांना बोलावून घेतले. तेव्हा त्यांनाही घेराव घालण्यात आला. ते यंत्र चोरीला गेल्याची तक्रार दाखल करावी, ज्यांच्याकडे ते सापडेल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सेनेने केली. गोंधळ वाढू लागल्याने सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. िपपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन विधाते मुख्यालयात आले. महापालिकेने तक्रार दाखल करावी अन्यथा पोलीस स्वत:हून गायब झालेल्या यंत्रांचा शोध घेतील, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले.