राज्यकर्ते व साखर कारखानदारांकडून आज ऊसदराचा सकारात्मक निर्णय होईल, अशी सर्वसाधारण शक्यता धुळीस मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युध्दभूमी म्हणून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडात उद्या दुपारपासून शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. आजच्या ऊसदराच्या मुंबईतील बैठकीचा केवळ आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी बनावच होता, असा सरळसोट आरोप करीत ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांनी कराडातच ताकदीने आंदोलन छेडून राज्यकर्त्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय क्रांतिकारकांच्या या भूमीतील शेतकरी गप्प बसणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. परवा सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनीच ‘कराड बंद’ ची हाक देऊन राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या समाधीला स्पर्श न करून देण्याचाही इशारा दिला आहे. तर, पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास भर बाजारपेठेतून जंगी संचलन करून ‘हम, कुछ कम नही’ असेच चित्र रंगवले आहे. तसेच, आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर कराडात शेकडो पोलीस व जलद कृतीदलाची पथके दाखल होत असल्याचे वृत्त आहे.
यंदाच्या  हंगामातील ऊस गाळप व साखर उद्योगांच्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी आज शनिवारी सकाळी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक पार पडली. बैठकीला शेतकऱ्यांचे नेते  खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, विरोधी पक्षनेते व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या कळीच्या ऊसदर प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल असा सर्वाना विश्वास होता. परंतु, बैठकीचा बार फुसकाच निघाल्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांसह ऊस उत्पादकांनी कमालीची नाराजी व्यक्त करून, राज्यकर्ते व साखर सम्राटांना आंदोलनाच्या हिसक्याने ताळय़ावर आणण्याचा निर्धार केल्याचे चित्र शेतकरी संघटनांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. मुंबईतील ऊसदराची बैठक निष्फळ ठरल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेअंती आक्रमक आंदोलनाच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. तर, वाढीव ऊसदराचा सकारात्मक निर्णय न झाल्याने ऊस उप्तादकातून अन्यायाची भावना व्यक्त केली जात आहे.
पंजाबराव पाटील यांनी दुपारच्या सुमारास कराडच्या विश्रामगृहावर पत्रकार बैठक आयोजित केली. परंतु, तेथे त्यांना मज्जाव करण्यात आल्याने विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील पारावर पत्रकार बैठक घेण्यात आली. असा प्रकार प्रथमच घडल्याने पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली. यावेळी पाटील म्हणाले, की आम्हाला पत्रकार बैठकीला व आंदोलनालाही जागा दिली जात नाही. हे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या जिवावर सत्तेत आले. परंतु, ते आता शेतकऱ्याच्याच जिवावर उठले आहेत. १५ नोव्हेंबरला आम्ही ऊसदरासाठी कराडात शांततापूर्ण आंदोलन केले. यावर आंदोलनाची व्याप्ती आणि आक्रमकता गांभीर्याने घेवून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातर्फे ऊसदराच्या सकारात्मक निर्णयासाठी मुदत मागितली. त्यानुसार उद्या २४ नोव्हेंबर ही त्यांना अंतिम मुदत देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासंदर्भात काहीही हालचाली केल्या नाहीत तर, काल अचानक बैठकीचे आवतण आमच्या नेत्यांना आले. ऊसदराचा प्रश्न मिटून शेतकऱ्याला न्याय मिळणार या आशेने आम्ही आनंदीत होतो. परंतु, मुख्यमंत्र्यांनी व राज्यकर्त्यांनी घूमजाव केले. ऊसदरासंदर्भात ठोस बोलणी केली नाही. या बैठकीच्या माध्यमातून दिशाभूल करीत आंदोलनाची हवा काढण्याचाच डाव खेळला गेला. तसेच, केवळ आमचे आंदोलन मोडीत हाणून पाडण्याचा एकमेव उद्योग सध्या राज्यकर्ते व साखर सम्राटांकडून सुरू आहे. गतवर्षी पहिली उचल २,५०० रूपये दिलेली असताना, यावर्षी पहिली उचल त्यापेक्षाही कमी देण्याचा डाव साखर कारखानदारांनी आखला आहे, असे आरोप पंजाबरावांनी केले.
ऊसदरासाठी आता ‘आर या पार’चा लढा लढल्याखेरीज पर्याय नसल्याने उद्या रविवारी ठिकठिकाणच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी अंथरूण, पांघरूण घेऊन प्रदीर्घ आंदोलनाच्या तयारीने कराडात मुक्कामी दाखल व्हावे, लाखोंच्या संख्येने न्याय्य आंदोलन छेडून राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून द्यावी, शेतकऱ्यांची सहनशीलता संपल्याने आता चर्चेतून काही घडणार नाही याची खूणगाठ बांधून सक्त आंदोलनाचा पवित्राच घ्यावा, असे कळकळीचे आवाहन पाटील यांनी केले. आंदोलकांच्या भोजनाची चिंता आम्हाला नाही. कराड तालुक्यातील तमाम जनता पिठलं-भाकरी, चटणी-भाकरी पाठवून आपल्या आंदोलनाचे स्वागतच करील, असा विश्वास त्यांनी दिला. आंदोलनासाठी सैदापूर येथील आयटीआय कॉलेजची प्रशासनाकडून सुचविण्यात आलेली जागा अपुरी असल्याने ती आम्ही नाकारली आहे. तरी, आम्ही कृष्णा घाटावरच आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यकर्त्यांनी सहकार चळवळ मोडीत काढण्याचा घाट घातला आहे. आणि त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेण्यासाठी चव्हाणसाहेबांच्या  पुण्यतिथीदिनी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी ते येणार आहेत. मात्र, आम्ही त्यांना समाधीला स्पर्श करू देणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने ऊसउत्पादक येतील. तरी, पोलिसांनी बळाचा वापर करून चव्हाणसाहेबांच्या कराडला काळिमा फासला जाईल असे कृत्य करू नये. बहुतांश पोलीस शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. तरी, त्यांनीही कर्तव्याच्या चाकोरीत राहून न्यायाची भूमिका घ्यावी असेही आवाहन पंजाबराव पाटील यांनी केले.